Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सुरक्षा वाढीबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:41 AM2022-04-19T11:41:35+5:302022-04-19T11:45:30+5:30

केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे.

Raj Thackeray: The Home Minister has clearly stated about increasing the security of Raj Thackeray | Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सुरक्षा वाढीबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सुरक्षा वाढीबाबत गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Next

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लवकरच केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविली जाण्याची शक्यता आहे. राज यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ७ फेब्रुवारी रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्राद्वारे केली होती. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने या पत्राकडे साफ दुर्लक्ष केल्याचा मनसेनं आरोप केला आहे. त्यावर, आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

''केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवणं हे राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. राज्य सरकार नियमांनुसार सुरक्षा पुरवत असतं, राजकीय निर्णय नसतो," असं मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील अनेक नेत्यांना मिळालेल्या केंद्राच्या सुरक्षेवर गृहमंत्र्यांनी लक्ष देत मत मांडलं आहे. ''अलिकडे राज्याच्या सार्वभौम अधिकाराला बाजूला सारुन काही व्यक्तींना केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते. हे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. या राज्यातील सर्व नागरिकांचं रक्षण करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे. पण, ठीक आहे केंद्र सरकारचा अधिकार आहे, ते सुरक्षा देऊ शकतात. आता त्या सुरक्षेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवायचं.", असेही वळसे पाटील यांनी म्हटले आहे.  

राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबात वळसेपाटील म्हणाले

"राज ठाकरेंसमोर सर्व चॉईस खुले आहेत. राज्याला पत्र लिहिलं असेल तर ते योग्यवेळी प्रोसेस होऊन त्याबाबत योग्य निर्णय होईल. एखाद्याला सुरक्षा देण्याबाबतची प्रक्रिया ठरलेली असते. चर्चा होऊनच निर्णय होतात. कोणाला किती सुरक्षा द्यावी, याबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर एक समिती आहे. त्यामध्ये पोलीस अधिकारी, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी असतात. कोणाला काही धोका असेल तर ते त्याबाबत निर्णय घेतात. हा संपूर्ण अधिकार समितीला आहे, कोणत्याही राजकीय व्यक्तीला नाही.", असे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिले. 

राज ठाकरेंच्या सुरक्षेत कपात

राज ठाकरे यांना पूर्वी झेड दर्जाची सुरक्षा होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी यात कपात करून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. मात्र, राज यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा अहवाल गुप्तचर खात्याने दिला होता. या अहवालाकडे दुर्लक्ष करत सरकारने उलट सुरक्षेत कपात केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने पीएफआय या संघटनेने त्यांना धमकी दिली होती. अन्य काही धार्मिक संघटनांनीही राज यांच्या भूमिकेला विरोध करत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षा देण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत आहे.

सेलिब्रिटींसह नेत्यांना केंद्राची सुरक्षा

केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रानौत, भाजप नेते किरीट सोमय्या, खा. नवनीत राणा यांना सुरक्षा दिली होती. विशेषत: महाविकास आघाडी सरकारविरोधात भूमिका घेणाऱ्या नेत्यांना केंद्राने स्वत:चे सुरक्षाकवच बहाल केले आहे. सध्या राज ठाकरे यांनी मविआ सरकारविरोधात सूर आळवले आहेत. त्यातच मशिदींवरील भोंग्यांना ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा मशिदींच्या बाहेर  दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला आहे. राज ठाकरे हे लवकरच अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांना ही सुरक्षा पुरविण्यात येणार असल्याचे समजते.

 अमित शहांना पत्र लिहिणार -
- राज ठाकरे यांना काही संघटनांकडून धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती.
- त्यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारला पत्र लिहिणार आहे. 
- राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबीयांनादेखील सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केली जाईल. 
- तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही याबाबत पत्र देणार असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
 

Web Title: Raj Thackeray: The Home Minister has clearly stated about increasing the security of Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.