Join us  

राज ठाकरे भल्या पहाटे मॉर्निंग वॉकसाठी शिवाजी पार्कवर अवतरतात तेव्हा...

By रोहित मोहन धामणस्कर | Published: April 01, 2018 1:06 PM

महाराष्ट्रातील गेल्या कित्येक दशकांच्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर रविवारी पहाटे एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी उगवले होते.

मुंबई: महाराष्ट्रातील गेल्या कित्येक दशकांच्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार असलेल्या शिवतीर्थावर रविवारी पहाटे एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पहाटे ५.३० वाजता मॉर्निंग वॉकसाठी उगवले होते. 'चंद्रवंशी' असलेल्या राज ठाकरे यांचा दिवस एरवी बराच उशिरा सुरू होतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामह शरद पवार यांनी मध्यंतरी, 'पक्ष वाढवायला सकाळी लवकर उठावं लागतं', अशी टिप्पणी करून राज यांना हळुवार चिमटाही काढला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या मुलाखतीत राज यांनी आपण ही सूचना अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले होते. मात्र, हा दिवस याचि देही, याचि डोळा पाण्यासाठी १ एप्रिल २०१८ या ऐतिहासिक दिवसाची वाट पाहावी लागली.साहजिकच दररोज शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी येणारे लोक राज यांना त्याठिकाणी पाहून काही वेळासाठी थबकले. यावेळी राज यांच्यासोबत त्यांचे दोन आवडते श्वान आणि एक सहाय्यकही होता. येथील अनेक लोकांनी हा दुर्मिळ योग कॅमेऱ्यात टिपला. पहाटेची वेळ असल्याने अनेकांच्या कॅमेऱ्याचे फ्लॅश चकाकत होते. त्याकडे राज यांनी नेहमीप्रमाणे तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकत नापसंती व्यक्त केली. परंतु, फ्लॅश मारणाऱ्यांना आपल्या ठाकरी शैलीत समज देणे राज यांनी टाळले. सुरूवातीचा अर्धा तास जॉगिंग केल्यानंतर राज ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापाशी गेले. येथे काही मिनिटं घालवल्यानंतर थोड्याशा अंतरावर चालत जाऊन राज बराचवेळ सुर्योदयाच्या तांबूस छटांनी न्हाऊन निघालेल्या आकाशाकडे बराचवेळ एकटक पाहत होते.सध्या मनसेचे सामान्य कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाकडून राज यांच्या अनपेक्षित कृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. जाणकारांच्या मते राज ठाकरे यांनी ही कृती जाणीवपूर्वक केलेली असून ही भविष्यातील मोठ्या बदलाची चाहूल आहे. एरवी राज सामान्य लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये फार कमी मिसळतात. परंतु, राज यांची आजची कृती पाहता त्यांनी ग्राऊंड लेव्हलला उतरून काम करणार असल्याचा सूचक इशारा दिल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आहे. हे ऐकून मनसेच्या कार्यकर्त्यांना नवे स्फुरण चढले आहे. मात्र, आता सर्वजण ज्यांच्या अमूल्य सल्ल्यामुळे हा सुदिन उजाडला त्या बारामतीच्या काकांच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

टॅग्स :राज ठाकरे