22 तारखेला ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:46 PM2019-08-20T14:46:01+5:302019-08-20T14:59:45+5:30

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, अशी सक्त ताकीद राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली आहे.

Raj Thackeray appeals to MNs worker not to come ED office on 22nd | 22 तारखेला ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

22 तारखेला ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन

Next

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 22 ऑगस्ट रोजी ईडीच्या चौकशीसाठी बोलवल्यामुळे मुंबई आणि ठाण्यासह अनेक ठिकाणी मनसैनिकांनी बंदचा इशारा दिला होता. मात्र, लागलीच राज यांनी हस्तक्षेप करून लोकांना त्रास होईल, असे काही करू नका, अशी सक्त सूचना दिल्यानंतर हा बंद मागे घेण्यात आला. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये, अशी सक्त ताकीद राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिली आहे.

राज ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून तुमच्या माझ्यावर अनेक केसेस झाल्या, आणि प्रत्येक वेळेस आपण सर्वांनी तपास यंत्रणांचा आणि न्यायालयाच्या नोटिसांचा आदर केला आहे, त्यामुळे आपण ह्या अंमलबजावणी संचानालयाच्या(ईडी) नोटिसीचा देखील आदर करू. इतक्या वर्षात आता तुम्हाला आणि मला केसेस आणि नोटिसांची सवय झाली आहे; म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की येत्या 22 ऑगस्टला शांतता राखा.

सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होणार नाही आणि सामान्य जनतेला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न होणार पण तरीही तुम्ही शांत राहा, असं आवाहनच राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना केलं आहे. तसंच माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो माझ्यावर तुमच्या सर्वांच्या असलेल्या प्रेमाची मला जाणीव आहे पण तरीही विनंती की कुठल्याही पदाधिकाऱ्याने अथवा महाराष्ट्र सैनिकांनी ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ अथवा जमू नये. ईडी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, सामान्य जनता आणि व्यापारी वर्गाला त्रास होता कामा नये, यासाठी राज ठाकरेंनी हा निर्णय घेतल्याचंही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

राज ठाकरेंबरोबर कोण जाणार हे त्यादिवशीच ठरवू, कार्यकर्त्यांच्या बैठकीतील निर्णय राज ठाकरेंना कळवण्यात आला होता. त्यानंतर राज ठाकरेंनी सरकारचा निर्णय आहे आपण स्वागत केलं पाहिजे. तुम्हाला डिवचायचा प्रयत्न झाला तरी सावधान राहा, असं आवाहनही राज ठाकरेंनी केल्याचं बाळा नांदगावकरांनी सांगितलं. राज ठाकरेंनी आवाहन केल्यामुळे मनसैनिक आणि पदाधिकारी शांतता पाळण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आम्हाला आशा आहे, असंही मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. 

Web Title: Raj Thackeray appeals to MNs worker not to come ED office on 22nd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.