Join us  

राज कुंद्रासह साथीदाराला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:05 AM

व्हाँँट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून सुरु होते रॅकेट,लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योगपती ...

व्हाँँट्स अँप ग्रुपच्या माध्यमातून सुरु होते रॅकेट,

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सिनेअभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांच्या अटकेपाठोपाठ कुंद्रा यांच्या कंपनीचा आयटीतज्ज्ञ रायन थॉर्प याला नेरूळमधून अटक करण्यात आली आहे. दोघांनाही मंगळवारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यात कुंद्रा हा पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, व्हॉट्सॲपवरून याचे कामकाज सांभाळत असल्याचे तपासात समोर आले आहे.

याप्रकरणात मालमत्ता कक्षाने आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आलेल्या उमेश कामतच्या चौकशीत कुंद्रा कनेक्शन उघडकीस आले. कामत हा कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे.

कामतने गुन्हे शाखेला दिलेल्या माहितीत, लंडनस्थित असलेल्या केनरिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक प्रदीप बक्षी हे असून, ते राज कुंद्रा यांचे नातेवाईक आहेत. राज कुंद्रा याने ५ फेब्रुवारी २०१९ रोजी आर्म्स प्राइम मीडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन करून केनरिन कंपनीसाठी हॉटशॉट हे ॲप विकसित केले. पुढे जुलै ते ऑगस्ट २०१९ या कालावधीत हे ॲप २५,००० डॉलर किमतीला केनरीन कंपनीला विकले. कुंद्रा यांच्या सांगण्यावरून कामत हा केनरिन प्रायव्हेट कंपनीच्या भारतातील को-कॉर्डिनेटर म्हणून त्यांच्या अंधेरीतील शालिमार येथील कार्यालयातून कामकाज पाहत असल्याचे पोलिसांना सांगितले.

कुंद्राने पॉर्न फिल्म आणि वेब सिरीज बनविण्यासाठी अर्थपुरवठा केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक केली आहे. एक पॉर्न फिल्म बनवण्यासाठी ५ ते ७ लाख रुपये खर्च येत होता. पुढे या माध्यमातून राज कुंद्रा याने कोट्यवधी रुपये कमावल्याचा संशय पथकाला आहे. त्यानुसार पथक अधिक चौकशी करत आहे.

व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सुरू होते रॅकेट

कुंद्राने हॉटशॉटच्या कामकाजासाठी ‘एचसी टेक डाउन’, ‘एचसी अकाउंट’ आणि ‘एचसी ऑपरेशन’ हे ३ व्हाॅट्सॲप ग्रुप तयार केले होते. ते या ग्रुपचे प्रमुख होते. या ग्रुपवरून राज कुंद्रा सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते. हॉटशॉट्स या ॲपद्वारे प्रसारित होणाऱ्या फिल्मचे कन्टेन्ट, कलाकारांना द्यावयाचे मानधन, ॲपद्वारे दररोज मिळणारे उत्पन्न याबाबत याच व्हाॅट्सअ‍ॅप ग्रुपवरून कुंद्रा सूचना देत असल्याचे आढळून आले आहे. तसेच हॉटशॉटच्या अकाउंट ग्रुपवरून कोणाला किती पैसे द्यायचे हे ठरवायचे. त्यानुसार केनरिनकड़ून पैसे पुरविण्यात येत होते. व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटही पोलिसांनी घेतले आहे.