Join us

मुंबईकरांचा वर्षायोग...

By admin | Updated: June 22, 2015 02:11 IST

शहरासह उपनगरांत पडणाऱ्या रिमझिम पावसात योगोत्सुकांनी पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.

मुंबई : शहरासह उपनगरांत पडणाऱ्या रिमझिम पावसात योगोत्सुकांनी पहिला आंतरराष्ट्रीय योगदिन अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा केला. पावसाच्या साथीने ठिकठिकाणी लहानग्यापासून थोरांपर्यंत सर्वांनी योग प्रात्यक्षिके केली. या योगोत्सवात पोलीस, राजकारण्यांपासून सेलीब्रिटींपर्यंत अनेकांनी आवर्जून सहभाग घेतला. मुंबईकर सुटीच्या दिवशीही उत्साहात घराबाहेर पडले. अनेकांनी खास योग दिनानिमित्त योगाचे महत्त्व पटवून सांगणाऱ्या संदेशांचे टी-शर्ट्स परिधान केले होते. याप्रसंगी कार्यक्रमांच्या ठिकाणी योगासनांची माहिती देणाऱ्या, योगाचा इतिहास विशद करणाऱ्या ग्रंथांचे वितरण करण्यासाठी पुस्तकांचे स्टॉल्सही लावण्यात आले होते. ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे राजभवनमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात ब्रह्मकुमारी दिव्यप्रभा यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित लोकांसह राज्यपालांनी राजयोग ध्यानधारणा केली. योग म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी करावयाची आसने नाहीत; तर योग ही तन, मन आणि आत्मा यांचा ‘समयोग’ साधणारी क्रिया आहे, असे प्रतिपादन राज्यपाल विद्यासागर राव यांनी या वेळी केले. या कार्यक्रमाला ब्रह्मकुमारीचे अतिरिक्त महासचिव ब्रह्मकुमार रमेश, माउंट अबू येथील ब्रह्मकुमारी मुख्यालयातून आलेल्या ब्रह्मकुमारी उषाबेन, ब्रह्मकुमारी रुक्मिणी, ब्रह्मकुमारी वंदना यांची उपस्थिती होती. विक्रोळीमध्ये डबेवाला एज्युकेशन सेंटर येथे मुंबईच्या डबेवाल्यांनीही आपल्या मुलांसह योगसाधना केली. या शिबिरात सुमारे १२० डबेवाल्यांनी सहभाग घेतला. या वेळी योगसाधनेवर आधारित माहितीपटही डबेवाल्यांना दाखविण्यात आला. विलेपार्ले येथील पालिकेच्या दीक्षित शाळेत राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांसोबत योग प्रात्यक्षिके केली. याप्रसंगी शालेय अभ्यासक्रमात योगाचे धडे आणण्याचा विचार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मांडला. याबाबत शिक्षणतज्ज्ञ, योगतज्ज्ञ आणि संबंधितांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच युवापिढीसाठी योगा नक्कीच उपयोगी असेल, त्यामुळे जनसामान्यांपर्यंत योगाचा प्रचारआणि प्रसार करू, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)