Join us  

राज्यभरात पावसाचा वेग कायम

By admin | Published: July 04, 2017 5:28 AM

मुंबईसह राज्यात कोसळणाऱ्या मान्सूनची आगेकुच सुरुच असून, सोमवारी मान्सून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आणखी काही

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईसह राज्यात कोसळणाऱ्या मान्सूनची आगेकुच सुरुच असून, सोमवारी मान्सून हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे. तत्त्पूर्वी राज्यभरात पडणाऱ्या पावसाचा वेग मुंबई शहर वगळता उपनगरात कायम असून, सोमवारीही शहरात कमी प्रमाणात तर उपनगरात अधिक पाऊस पडल्याचे चित्र होते.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. ४, ५, ६ आणि ७ जुलै रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या सरींचा जोर कायम असून, पडझडही सुरुच आहे. सोमवारी ३ ठिकाणी बांधकामाचा भाग पडल्याची घटना घडली. सहा ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ४५ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांत मनुष्यहानी झाली नसून, येत्या ४८ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.