मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेन ‘ब्लॉक’; बारा तासांनी लोकल सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 04:17 AM2019-08-05T04:17:37+5:302019-08-05T04:17:56+5:30

कल्याण-कर्जत वाहतूक दोन दिवस बंद राहण्याची चिन्हे, कल्याण-कसारा वाहतूकही ठप्प

Rain 'Block' in Mumbai, Thane, Palghar | मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेन ‘ब्लॉक’; बारा तासांनी लोकल सुरू

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेन ‘ब्लॉक’; बारा तासांनी लोकल सुरू

Next

मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी कोसळलेल्या धुवाधार पावसाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला झोडपून काढल्याने वेगवेगळ्या दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला, तर वाहून गेलेल्या तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. पावसामुळे मुंबई ते ठाण्यादरम्यान बंद पडलेली लोकल वाहतूक बारा तासांनी सुरू झाली. मात्र लांब पल्ल्याची वाहतूक खोळंबलेली आहे. शेलूजवळ रेल्वे रुळांखालील खडी वाहून गेल्याने वांगणी, बदलापूरसह अन्य ठिकाणी रूळ पाण्याखाली गेल्याने कल्याण ते कर्जतदरम्यानची वाहतूक दोन दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. वासिंदजवळ रेल्वे रूळ पाण्याखाली असल्याने कल्याण-कसारा वाहतूकही ठप्प आहे.

अतिवृष्टीची शक्यता असल्याने मुंबई शहर, उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठाला सोमवारी सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या पीजीडीएफएम व पीजीडीओआरएम या अभ्यासक्रमांची पुनर्परीक्षा सोमवारी होती, ती पुढे ढकलली आहे. या दोन पेपरच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. अतिवृष्टीच्या काळात रविवारपासून ठाणे-पालघर जिल्ह्यातील आपत्कालीन कक्षांसह नौदल आणि एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील उल्हास, भातसा, बारवी, काळू, वालधुनी, गांधारी आदी नद्यांना पूर आल्याने आसपासच्या गावांत पाणी शिरले. त्या सर्व भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातही वैतरणा, पिंजाळ, सूर्या आदी नद्यांचे पाणी आसपासच्या भागांत शिरले. ठाण्यात दिवा भागात खाडीचे पाणी शिरल्याने सात बोटींच्या साहाय्याने ६,५०० जणांची सुटका करण्यात आली.

ठाणे, पालघरमध्ये पावसाचे चार बळी
भिवंडीत पुराच्या पाण्यात दोन घटनांमध्ये रविवारी टेम्पोचालक व कामगार असे दोघे जण वाहून गेले. त्यातील एकाचा मृतदेह सापडला. मीरा रोड येथे एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह नाल्यात सापडला. तर वसईत चौदा वर्षांचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला.

२४ तासांत २०४ मिलीमीटर पाऊस
मुंबापुरीला झोडपून काढत रविवारी जनजीवन ठप्प करणाºया पावसाची २४ तासांत तब्बल २०४ मिलीमीटर एवढी नोंद झाली. तर मुंबई शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी ४०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला.
कोसळधारेदरम्यान ठिकठिकाणी पडझडही झाली असून, सांताक्रुझमधील पटेलनगर येथे शॉक लागून माला नागम (५२) या महिलेसह तिचा मुलगा संकेत नागम (२६) यांचा मृत्यू झाला.
गोरेगाव येथे दरड कोसळून चार जण जखमी झाले. धारावीमधील राजीव गांधी नगर येथील मुलगा राजा मोहम्मद शेख हा प्रातर्विधीसाठी गेला, तो परतलाच नाही. तो खाडीत पडला असावा, असा अंदाज स्थानिकांनी वर्तविला.
 

Web Title: Rain 'Block' in Mumbai, Thane, Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.