Join us  

राधेश्याम मोपलवार यांना सहा महिन्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 8:59 AM

निवृत्तीनंतर लगेचच २८ फेब्रुवारी २०१८ रोजी मोपलवार यांना एक वर्षाकरता करार पद्धतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अवर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमण्यात आले होते.

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ ३० नोव्हेंबर पर्यंत असेल.निवृत्तीनंतर लगेचच २८ फेब्रुवारी २०१८ रोजी मोपलवार यांना एक वर्षाकरता करार पद्धतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अवर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमण्यात आले होते. हा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१९ रोजी मोपलवार यांना पुन्हा एकदा एक वर्षासाठी, तर २८ फेब्रुवारी २०२० ला तीन महिन्यासाठी आणि २८ मे २०२० ला पुन्हा एक वर्षांसाठी अशी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत ३१ मे रोजी संपली. राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत  समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे मोपलवार यांच्या नियुक्तीस आणखी सहा महिन्यांसाठी  चौथी मुदतवाढ देण्यात आली आहे. आपण अधिक वेगाने काम पूर्ण करू त्याकडे आपले लक्ष असेल, अशी प्रतिक्रिया मोपलवार यांनी दिली आहे.नागपूर ते मुंबई हा ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी ५२० किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यातही ४५५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून महिन्याला २० किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात येत आहे.