Radhakrishna Vikhe-Patil reaction on Elphinstone Road stampede | एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही? - विखे पाटील
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही? - विखे पाटील

मुंबई - एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीतील गरजू पीडित कुटुंबांना वर्षभरानंतरही नोकरी का नाही, अशी विचारणा करून या नकारात्मक व उदासीन भूमिकेतून सरकारची असंवेदनशीलता दिसून आल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

प्रभादेवी अर्थात जुन्या एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेला एक वर्ष झाल्याच्या अनुषंगाने प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. या चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून विखे पाटील म्हणाले की, या घटनेत अनेक कुटुंबांनी घरातील एकमेव कमावता व्यक्ती गमावला होता. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या कुटुंबांचे सर्वेक्षण करून ज्या कुटुंबातील आर्थिक आधार हरपला असेल, त्या कुटुंबातील एका व्यक्तीला रेल्वेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी आम्ही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती. पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक राहुल जैन यांची भेट घेऊन रेल्वे मंत्र्यांना लिहिलेले पत्र आपण त्यांच्याकडे सोपवले होते. मुख्यमंत्र्यांनी देखील या घटनेतील गरजू कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यासंदर्भात पाठपुरावा करावा, अशी मागणी आम्ही केली होती. परंतु, आता वर्षभरानंतरही एका कुटुंबाला देखील रेल्वे खाते नोकरी देऊ शकलेले नाही.

महाराष्ट्र सरकार व रेल्वे विभागाने पीडितांना आर्थिक मदत दिली. परंतु, कमावता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांसाठी ही एकरकमी मदत पुरेशी नाही. या कुटुंबांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह लागले असून, त्यांना कायमस्वरूपी आधार देण्याची आवश्यकता आहे. आता रेल्वे प्रशासन सांगते की, आम्ही नोकरीचे आश्वासन दिले नव्हते. त्यांनी नोकरीचे आश्वासन दिले नव्हते, हे खरे असले तरी एल्फिन्स्टनचे बळी हे रेल्वे विभागाच्या बेफिकीरीचे बळी होते. त्यामुळे गरजू पीडित कुटुंबांना संपूर्ण पाठबळ देणे, हे त्यांचे नैतिक कर्तव्यच आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आणि गरजू पीडित कुटुंबांची मागणी लक्षात घेता या घटनेतील मृतकांच्या वारसांना रेल्वेत सामावून घेण्याची आवश्यकता असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. 


 

Web Title: Radhakrishna Vikhe-Patil reaction on Elphinstone Road stampede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.