Join us  

सत्ताधारी-विरोधकांमध्ये राडा

By admin | Published: December 18, 2014 1:19 AM

अंडरस्टँडिंग फिसकटल्यामुळे पालिका मुख्यालयात आज पळापळीचे नाट्य चार तास रंगले़ आदल्या रात्री सदस्यांना पाठविलेला

मुंबई : अंडरस्टँडिंग फिसकटल्यामुळे पालिका मुख्यालयात आज पळापळीचे नाट्य चार तास रंगले़ आदल्या रात्री सदस्यांना पाठविलेला उद्यानांच्या विकासाचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेना-भाजपाने बहुमताने मंजूर केला़ या प्रकरणी चिटणीसांना घेराव घालून ही मंजुरी नियमबाह्य असल्याचे विरोधकांनी लिहून घेतले़ याची कुणकुण लागताच स्थायी समितीचे अध्यक्ष शिवसेनेच्या नगरसेवकांसह चिटणीस कार्यालयात धडकले़ या नाट्यात बापुडा बनलेल्या चिटणीसांची दीनवाणी अवस्था झाली़उड्डाणपुलाखालच्या जागांचे सौंदर्यीकरण, उद्यानांचा विकास व वाहतूक बेट बांधण्याचा ९५ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज आला होता़ मात्र नियमानुसार ७२ तासांआधी स्थायी समितीचा अजेंडा सदस्यांपर्यंत पोहोचणे बंधनकारक आहे़ त्यामुळे हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्याची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली़ तरीही मनमानी पद्धतीने स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा प्रस्ताव बहुमताने मंजूर केला़ त्यामुळे विरोधी पक्षांनी प्रस्तावाचे कागद भिरकावून सभात्याग केला़ त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, समाजवादीचे गटनेते रईस शेख, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ तडक चिटणीस कार्यालयात पोहोचले़ चिटणीस नारायण पठाडे यांना तासभर कार्यालयात डांबल्यानंतर, हा प्रस्ताव नियमबाह्य मंजूर झाल्याचे त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले़ ही खबर चिटणीसांमार्फत कशी तरी शिवसेनेच्या कानापर्यंत पोहोचताच स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, भाजपाचे गटनेते मनोज कोटक अशी सत्ताधाऱ्यांची फौज चिटणीसांच्या कार्यालयात अवतरली़ चिटणीसांना खरीखोटी सुनवून बाहेर आलेल्या अध्यक्षांनी चिटणीसांवरच खापर फोडत प्रस्ताव आता मंजूर झाला, अशी उडवाउडवी केली़ त्यानंतर विरोधी पक्षांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी निघालेले चिटणीस संध्याकाळपर्यंत कोणाला दिसले नाहीत. (प्रतिनिधी)