Join us  

वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे मोनोच्या सेवेवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:02 AM

सेवा सुधारण्याचा एमएमआरडीएचा दावा

मुंबई : सोमवारी सकाळी गर्दीच्या वेळेमध्ये मोनोरेल बंद पडल्याने प्रवाशांना खूप मनस्ताप सहन करावा लागला होता. मोनोरेलला करण्यात येणारा वीजपुरवठा बंद झाल्याने चेंबूरमधील वाशीनाका येथे मोनो बंद पडली होती. अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याने मोनो सेवेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत आम्ही पाठपुरावा करून सेवा चांगली सुधाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.सेवा सुधारण्याचा प्रयत्न आम्ही करीत असून या घटनेनंतर पाठपुरावा घेत असल्याचे प्राधिकरणाचे सह प्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी सांगितले. तसेच सुरक्षेतही वाढ करीत असून मोनोच्या सुट्ट्या भागांचा प्रश्न सुटला आहे. ही सेवा सुधारण्यासाठी आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जाणार असून यावर मोठे काम केले जाणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले. गेल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येही वीजपुरवठा खंडित झाल्याने मोनोरेल रखडली होती. नोव्हेंबर २०१७ मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकात मोनोला आग लागली होती. त्यानंतर मोनो दहा महिने बंद होती तर आॅगस्टमध्ये मोनोरेल्वेच्या मार्गावर झाडाच्या फांद्या पडल्याने मोनो बंद पडली होती. तसेच यापूर्वी इंटरनेट केबल चाकामध्ये अडकल्यामुळे चेंबूर नाक्यावर मोनोरेल्वे बंद पडली. त्या वेळी अनेक प्रवासी मोनोमध्ये अडकले होते. अथक प्रयत्नांनंतर प्रवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली होती. प्रवाशांचा मोनोवरचा कमी होत असलेला विश्वास परत मिळवायचा असेल तर एमएमआरडीएला मोनोच्या अडचणी दूर कराव्या लागणार आहेत.

टॅग्स :मोनो रेल्वे