देशातील सव्वा लाख पुलांना मिळणार ओळखपत्र - पीयुष्य गोयल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 01:36 AM2019-07-21T01:36:09+5:302019-07-21T01:36:39+5:30

जबाबदारी निश्चित करणे होईल सोपे । पूल उभारणी, देखभाल, मोबाइल क्रमांक यांची सर्व माहिती

Pvt. Goyal will get three lakh bridges in the country | देशातील सव्वा लाख पुलांना मिळणार ओळखपत्र - पीयुष्य गोयल

देशातील सव्वा लाख पुलांना मिळणार ओळखपत्र - पीयुष्य गोयल

googlenewsNext

मुंबई : देशभरातील रोड ओव्हर पूल, पादचारी पूल व इतर पुलांना ओळखपत्र दिले जाणार आहे. देशातील सव्वा लाख पुलांना ओळखपत्र देऊन याद्वारे पुलाची माहिती, उभारणी तारीख, देखभालीची तारीख, अधिकारी आणि कंत्राटदारांची नावे आणि मोबाइल क्रमांक अशी इत्थंभूत माहिती असणारे ओळखपत्र दिले जाणार आहे. यामुळे सामान्य नागरिक आणि सरकार यांच्यात पारदर्शी कारभार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले. एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी निश्चित करणे सोपे होईल़

मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत ‘आय लव्ह यू मुंबई’, मध्य रेल्वे प्रशासन आणि शायना एन.सी. यांची जायंट वेल्फेअर फाउंडेशनतर्फे कार्यक्रम आयोजित केला होता. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भायखळा स्थानकाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी शनिवारी भूमिपूजनाचे आयोजन केले होते. गोयल म्हणाले की, भायखळा स्थानकाला मोठा इतिहास लाभला आहे. १८५३ साली लाकडाचे स्थानक होते. त्यानंतर १८५७ मध्ये स्थानकाला नवीन झळाळी देण्यात आली. आता या स्थानकाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यासाठी १६२ वर्षांनी सौंदर्यीकरण केले जाणार आहे. पुन्हा एका वर्षांनंतर आपली भेट या ठिकाणी होईल. या वेळी हे स्थानक प्रशस्त दिसून येईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

भायखळा स्थानकावरून प्रवासी म्हणून अनेक वेळा प्रवास केला आहे. मात्र मंत्री म्हणून पहिल्यांदाच आलो आहे. पूर्वीचे भायखळा आणि आताचे भायखळा यात खूप फरक झाला आहे. आता पुन्हा एका वर्षाने मोठा सकारात्मक बदल होणार आहे. संस्था, उद्योगपती यांनी भारतीय रेल्वेसोबत एकत्र येऊन रेल्वे विकासासाठी योगदान द्यावे. भारतीय रेल्वे मार्गात ४ हजार ५०० रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासह पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड, मरिन ड्राइव्ह या स्थानकाचे सुशोभीकरणाचे काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे गोयल म्हणाले.

आठ महिन्यांत नवीन रूप मिळणार
डोंगरी दुर्घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांना आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले, या दोन दु:खद घटनांविषयी गोयल यांनी श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमात आर्किटेक्चर अभा लांबा, म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण, आमदार वारिस पठाण, मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त अश्रफ के. के., मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी उपस्थित होते.

पुस्तकालय आधुनिक बनवा
स्थानकाची पाहणी करत असताना गोयल यांना स्थानकावरील पुस्तकालय दिसले. पुस्तकालयात पुस्तके नव्हती. या वेळी गोयल यांनी पुस्तकालयात ऐेतिहासिक, राजकीय, रेल्वेची माहिती देणारी पुस्तके ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. पादचारी पूल, अधिकाºयांची कार्यालये, शौचालय, रेल्वे मार्ग, खाद्यपदार्थांची दुकाने यांची पाहणी केली.

या स्थानकांचे होणार सौंदर्यीकरण
आंबिवली, वाशिंद, चुनाभट्टी, निळजे, डोंबिवली, कुर्ला, ठाणे, मुंब्रा या स्थानकांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. खासगी आणि सामाजिक संस्थेच्या वतीने स्थानकांचे सौंदर्यीकरण करून स्थानकाला जिवंत रूप दिले जाणार आहे.

खूप मोठी जबाबदारी
आय लव्ह मुंबईच्या विश्वस्त शायना एन.सी. म्हणाल्या की, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या स्थानकाला नवीन झळाळी देण्याची मोठी जबाबदारी आहे. मध्य रेल्वे प्रशासन आणि आर्किटेक्चर अभा लांबा यांनी सहकार्य केल्यामुळे भायखळा स्थानकाला नवीन रूप मिळणार आहे. प्रवाशांनी यासाठी मदत करण्याचे आवाहन शायना एन.सी. यांनी केले.

Web Title: Pvt. Goyal will get three lakh bridges in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.