Join us  

पुलंचा सहवास क्लासिक होता; विक्रम गोखले यांनी जागवल्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 3:37 AM

मला भार्इंचा मोठा सहवास लाभला. त्यांचे व्यक्तिमत्त्व उतुंग होते. त्यांचा परिणाम माझ्यावर झाला. मात्र पुलंचा तेवढा सहवास मला मिळाला नसला तरी जो सहवास मिळाला तो क्लासिक होता, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या.

मुंबई : मला भार्इंचा मोठा सहवास लाभला. त्यांचे व्यक्तिमत्त्व उतुंग होते. त्यांचा परिणाम माझ्यावर झाला. मात्र पुलंचा तेवढा सहवास मला मिळाला नसला तरी जो सहवास मिळाला तो क्लासिक होता, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या.पु.ल. देशपांडे आणि पार्लेकरांचे जुने ऋणानुबंध होते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शनिवारी सायंकाळी पार्ल्याच्या लोकमान्य सेवासंघाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर पुलोत्सवाला दिमाखात सुरुवात झाली. जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते पुलोत्सवाचे उद्घाटन झाले, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. विकास आमटे, लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष मुकुंद चितळे, माणिक राजवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमान्य सेवासंघात आयोजित पुलोत्सवाला पु.ल.प्रेमी पार्लेकरांनी मोठी गर्दी केली होती.विक्रम गोखले यांनी पुलंच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझे वडील चंद्रकांत गोखले यांनी संगीत मैफलीत अनवट राग गायला होता़ या कार्यक्रमाला पुल हे दोन तास हजर होते. त्यांनी वडिलांचे खास कौतुक करून त्यांना १०१ रुपये, शाल देऊन गौरव केला. पु़ल़ यांच्या पत्नी सुनीता यांनी समाजासाठी खूप काम केले. भाई गेल्यानंतर मी आवर्जून पुण्याला त्यांच्या घरी जाऊन तुम्ही कशा आहात? अशी विचारणा करत असे, असे सांगून वृद्धांची आस्थेने विचारपूस व चौकशी केली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. डॉ. विकास आमटे म्हणाले की, मी जरी पुलंचे साहित्य वाचले नसले तरी पु़ल़ हे एक माणूस म्हणून वाचले आहे़ ३५ वर्षे पुलंचा सहवास मला लाभला. ते आनंदवनात येत असत. पुलंनी मराठी माणसांना मानसिकता दिली. पु़ल़ ज्यांना चांगले म्हणत, त्यांना मोठी माणसे चांगली म्हणत. त्यांच्यामुळे सतीश दुभाषी, विजया मेहता, श्रीकांत मोघे, सुधीर मोघे आणि अनेक उतुंग व्यक्तिमत्त्वाची खूप माणसे येथे आली.

टॅग्स :विक्रम गोखले