कोरोना नियम पाळून होणार सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती परीक्षा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:18 PM2021-09-24T18:18:00+5:302021-09-24T18:18:36+5:30

Mumbai News: राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'गट क' आणि 'गट ड' संवर्गांतील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा येत्या २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहेत.

Public Health Department recruitment examination will be held following the Corona Rules | कोरोना नियम पाळून होणार सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती परीक्षा  

कोरोना नियम पाळून होणार सार्वजनिक आरोग्य विभागाची पदभरती परीक्षा  

googlenewsNext

मुंबई - राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'गट क' आणि 'गट ड' संवर्गांतील विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी परीक्षा येत्या २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहेत. या परीक्षांकरिता राज्यभरातील साडेनऊ लाखांहून अधिक परीक्षार्थी प्रविष्ट झाले असून राज्यभरात एक हजाराहून अधिक परीक्षा केंद्रे राज्य शासनाने जाहीर केली आहेत. ज्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांबाबत अडचणी आल्या, त्यांचे निराकरण परीक्षा प्रक्रियेचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीकडून तातडीने करण्यात आले असून त्याची माहिती परीक्षार्थींना ई-मेल आणि एसएमएसद्वारे देण्यात आली आहे. (Public Health Department recruitment examination will be held following the Corona Rules)

'गट क'साठी दि. २५ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ अशा दोन सत्रांत घेण्यात येणार आहे. तर 'गट ड'साठी दि. २६ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा दुपारी १२ ते २ या वेळेत घेतली जाईल. या परीक्षांसाठी अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी आपले प्रवेशपत्र अर्ज केलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घेता येते. तसेच हे प्रवेशपत्र ई-मेल व एसएमएसद्वारेही परीक्षार्थींना पाठविण्यात आले आहे.

या परीक्षेसाठी तब्बल २५ दिवस चाललेल्या नोंदणी प्रक्रियेत उमेदवारांना आलेल्या अडचणींचे निराकरण तांत्रिक साहाय्यक चमूच्या मदतीने २४ तासांच्या आत करण्यात आले. आता या परीक्षांद्वारे 'गट क' संवर्गात एकूण २७४० जागा, तर 'गट ड' संवर्गात ३५०० जागा भरण्यात येणार आहेत.


परीक्षा केंद्रावर चोख व्यवस्था
या परीक्षा प्रक्रियेचे व्यवस्थापन करणाऱ्या 'न्यासा कम्युनिकेशन'च्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रांवर कोणतीही अडचण परीक्षार्थींना येऊ नये, सुरळीतपणे परीक्षा पार पडाव्यात यासाठी परीक्षा सत्रासाठी एक केंद्र समन्वयक, परीक्षा केंद्र असलेल्या शाळा/महाविद्यालयाने नियुक्त केलेले केंद्र अधिक्षक, उपअधिक्षक, निरीक्षक, अतिरिक्त परीक्षा निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय परीक्षा केंद्रांवर करोना प्रतिबंधक नियमावलीचे पूर्णतः पालन केले जाईल. त्या दृष्टीने अंतर नियमनाचे भान राखत दोन परीक्षार्थींमधे पुरेसे अंतर राखले जाईल अशी आटोपशीर आसनव्यवस्था आणि निर्जंतुकीकरण व शरीर तापमानतपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर जॅमर बसविण्यात आल्याने कोणतीही इलेक्ट्रॉनिकल वस्तू तिथे चालणार नाही.

परीक्षेचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल : 
(१) ज्या पदांची शैक्षणिक अहर्ता ही पदवीधर आहे, अशा पदांसाठीच्या परीक्षेत मराठी विषय वगळता बाकी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजीत असतील. 
'गट ड'साठीच्या पदांची परीक्षा मराठीमधून होईल.
(२) 'गट क' व 'गट ड'साठीच्या पदांकरिता एकूण १०० प्रश्न असतील. यात प्रत्येक प्रश्नासाठी २ गुण, याप्रमाणे २०० गुणांची परीक्षा असेल.
(३) ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे.
(४) तांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण ६० प्रश्न आणि तांत्रिक विषयावर ४० प्रश्न असतील.
(५) परीक्षेचा कालावधी दोन तास असेल. परीक्षेत 'निगेटिव्ह मार्किंग' मूल्यांकन नसेल.

एसएमएस, ई-मेलकडे लक्ष द्या!
दि. २५ आणि २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या इतरही विभागांच्या परीक्षा असल्याने काही जिल्ह्यांत ऐनवेळी परीक्षा केंद्र बदलण्यात येऊ शकते; अर्थात अशा केंद्रांवरील परीक्षार्थींना आधीच एसएमएस, ई-मेलद्वारे त्याविषयी सूचित करण्यात आले आहे. यासाठी परीक्षार्थींनी त्यांना येणारे लघुसंदेश व ई-मेल यांकडे लक्ष द्यावे आणि आपले परीक्षा केंद्र कोणते आहे ते जाणून घ्यावे. परीक्षार्थींनी सर्व सूचना नीट वाचून त्या पद्धतीने आपली उत्तरपत्रिका पूर्ण करायची असून प्रश्नपत्रिकेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे. अधिक माहितीसाठी परीक्षार्थींनी www.arogyabharati2021.in आणि www.arogya.maharashtra.gov.in  या संकेतस्थळांवर भेट देऊन माहिती घ्यावी.

Web Title: Public Health Department recruitment examination will be held following the Corona Rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.