मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 04:22 AM2019-12-03T04:22:58+5:302019-12-03T04:25:04+5:30

मत्स्यालयासाठी जागा निश्चित करून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले.

Proposals for setting up a world-class aquarium in Mumbai | मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव

googlenewsNext

मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईमध्ये बँकॉक येथील सिअ‍ॅम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टिलेव्हल अ‍ॅक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पर्यटन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. या मत्स्यालयासाठी जागा निश्चित करून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागणार आहे. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय विकसित करावे. मुंबईला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या.
मुंबईतील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी सी वर्ल्ड, टुरीजम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरीजम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाइट सफारी आदी सुरू करता येईल का, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात एखादे योग्य ठिकाण शोधून तेथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर एखादे संग्रहालय सुरू करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करून ‘थीम बेस्ड’ संग्रहालय उभारण्यात यावे, असेही ते म्हणाले.
या वेळी सिंधुदुर्गमधील सबमरीन पर्यटन प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि दर्जेदार रस्त्यांची या प्रकल्पाला जोड द्यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करून त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.
या वेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजय मेहता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

रायगडचा सर्वांगीण विकास
रायगड किल्ला जतन व संवर्धन तसेच परिसर विकास करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पाचा या वेळी मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. रायगड विकास प्राधिकरणामार्फत तयार केलेल्या ६०६ कोटी रुपये रकमेच्या रायगड विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून रायगड आणि परिसरात काय केले जाणार आहे याचे सादरीकरण करण्यात यावे. पर्यटकांना आकर्षित करून त्यांना शिवरायांचा इतिहास दाखविण्याबरोबरच स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Proposals for setting up a world-class aquarium in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.