Join us  

ठाण्याच्या खाडीला रामसर दर्जा देण्याचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:07 AM

मुंबई : ठाणे खाडी येथील फ्लेमिंगो अभयारण्याचे रामसर साइटनुसार असलेले आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता या खाडीला रामसर दर्जा देण्याचा ...

मुंबई : ठाणे खाडी येथील फ्लेमिंगो अभयारण्याचे रामसर साइटनुसार असलेले आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता या खाडीला रामसर दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्याच्या कांदळवन कक्षाकडून सरकारला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना ठाण्यात पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची रामसर साइट अनुभवण्यास मिळू शकते. सोमवारी जागतिक कांदळवन दिनाच्या दिवशी कांदळवन संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी राज्य शासनाच्या वतीने रोडमॅप सादर करण्यात आला.

माझी वसुंधरा उपक्रमाच्या चौथ्या टाउनहॉलमध्ये हे जाहीर करण्यात आले. कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी ही घोषणा केली. यावेळी तिवारी म्हणाले की, ठाण्याच्या खाडीला रामसर दर्जा देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण मंत्रालयासोबत त्यावर काम सुरू आहे. त्यासाठी राज्य पाणथळ जागा प्राधिकरणाची मंजुरी अपेक्षित आहे. त्यानंतर केंद्र शासनाकडेदेखील हा प्रस्ताव सादर केला जाईल. हे काम जलद गतीने व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कांदळवनांना संरक्षित जंगलाचा दर्जा देण्यात येईल. तसेच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोनचादेखील उपयोग करण्यात येणार आहे.

यावेळी राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर म्हणाल्या, राज्यातील किनारपट्टी व अंतर्गत भागातील यादीबाहेर असणाऱ्या पाणथळ जागांचा नव्याने आढावा, नोंदी व सीमांकन करण्यासाठी एका कृती दलाचे गठन करण्यात येईल. यामुळे जास्तीत जास्त पाणथळ जागांचे संरक्षण होईल. पर्यावरणमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या कामाला गती देण्याचा प्रयत्न आहे. राज्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे कांदळवन व पाणथळ जागांचे संरक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे दिसून येते. मुंबई महानगर क्षेत्रात पूर समस्या टाळण्यासाठी शक्य तिथे कांदळवनांचे रोपण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.