Join us  

सुटीच्या दिवशीही होणार मालमत्ता कराची वसुली 

By जयंत होवाळ | Published: March 21, 2024 7:41 PM

गुरुवारी टॉप टेन थकबाकीदारांची आणखी एक यादी जाहीर करण्यात आली.

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकीच्या वसुलीसाठी पालिकेने जोरदार मोहीम उघडली असून साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. करसंकलन खात्याचे नागरी सुविधा केंद्र सुरूही राहणार आहे. गुरुवारी टॉप टेन थकबाकीदारांची आणखी एक यादी जाहीर करण्यात आली. ३१ मार्च २०२४ हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यापूर्वी आपल्या मालमत्तेसंबंधीचे कर भरण्यासाठी नागरिकही मोठ्या प्रमाणात संबंधित प्रशासकीय विभागांमध्ये येत आहेत. 

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये  २३ आणि २४ मार्च रोजी साप्ताहिक सुटी आहे. तर, २५ मार्च रोजी धुलिवंदन आणि २९ मार्च रोजी गुड फ्रायडेनिमित्त सार्वजनिक सुटी आहे. त्यावेळी, मालमत्ता करभरणा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या कालावधीत कर भरताना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि निर्धारित वेळेत त्यांचा करभरणा व्हावा, यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील साप्ताहिक आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही करभरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

२० मार्च रोजी जाहीर करण्यात आलेले ‘टॉप टेन’ मालमत्ता करधारक १) न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग)–१४ कोटी ४८ लाख ८९ हजार २४१ रुपये २) श्री.साई ग्रुप ऑफ कंपनीज (के पश्चिम विभाग) – १४ कोटी ०७ लाख  ९४ हजार ९८३ रुपये ३) कल्पतरू रिटेल व्हेंचर्स प्रा. लि. (एच पूर्व विभाग)- १० कोटी ७० लाख ७२ हजार १६२ रुपये ४) एव्हीएएलपी (आर मध्य विभाग)- १० कोटी ३८ लाख ७१ हजार ६६८ रुपये ५) न्यू लूक कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि (एफ उत्तर विभाग) – ०८ कोटी ९२ लाख ४४ हजार ६३१ रुपये ६) पीआरएल अगस्त्य प्रा. लि. (एल विभाग)- ०७ कोटी ४२ लाख ९५ हजार ८९४ रुपये ७) चंपकलाल के वर्धन आणि कंपनी- (जी उत्तर विभाग)- ०४ कोटी ९४ लाख ९१ हजार ०७० रुपये ८) केबल कॉर्पेारेशन ऑफ इंडिया- (आर मध्य विभाग) ०३ कोटी ५४ लाख ७० हजार २५३ रुपये ९) द टिंबर मार्केट (ई विभाग)- ०१ कोटी ५४ लाख १० हजार ४३८ रुपये १०) सुप्रीम सुखधाम (एच पश्चिम विभाग)- ०१ कोटी २२ लाख २४ हजार ३५२ रुपये. 

टॅग्स :मुंबईकर