Join us  

औषध, ऑक्सिजन वितरणाचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 1:35 AM

डॉ़ राजेंद्र शिंगणे : एफडीएच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांना उपचारासाठी लागणाºया ऑक्सिजनची भविष्यातील गरज लक्षात घेऊन उत्पादन वाढवावे. तसेच इतर व्यावसायिक कारणांसाठी लागणाºया ऑक्सिजन पुरवठा व वैद्यकीय कारणांसाठी लागणारे ऑक्सिजन याच्या वितरणाचे योग्य नियोजन करावे. असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.

ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज यांच्यासह आॅक्सिजन उत्पादक व पुरवठादार उपस्थित होते. राज्यातील कोविड-१९च्या ११ टक्के रुग्णांच्या उपचारांसाठी आॅक्सिजनची आवश्यकता भासते.

इतर रुग्णांना लागणारे आॅक्सिजन मिळून सुमारे ८०० मेट्रिक टन एवढे आॅक्सिजन लागते. सध्या एक हजार मे.टनपेक्षा जास्त आॅक्सिजनचे उत्पादन होत आहे. त्यामुळे आॅक्सिजनचा तुटवडा येऊ नये, मात्र वाहतूक व वितरण व्यवस्थेतील अडचणीमुळे काही ठिकाणी आॅक्सिजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व पुरवठादार आणि वाहतूकदार यांनी वितरणाचे जाळे वाढवून योग्य सहकार्य करून गरजूंपर्यंत आॅक्सिजन पोहोचेल याची खबरदारी घ्यावी. या कामात काही अडचण असल्यास अडचण दूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.येत्या काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उत्पादकांनी त्यांचे उत्पादन कसे वाढविता येईल याबाबत नियोजन करावे, तसेच योग्य वितरण प्रणाली राबविण्यात यावी. राज्यातील आॅक्सिजन टँकर व्यतिरिक्त इतर गॅसेससाठी वापरले जाणारे टँकरसुध्दा आॅक्सिजन वाहतुकीसाठी वापरण्याचे निर्देश डॉ. शिंगणे यांनी दिले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुंबई, ठाणे व इतर मोठ्या शहरात तुटवडा नसून राज्यातील दुर्गम भाग जसे विदर्भातील काही जिल्हे बुलडाणा, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद या दुर्गम भागातही रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध करण्यात यावे. यासाठी उत्पादक व वितरकांनी आवश्यक उपाययोजना करावी, असे निर्देश दिले. राज्यात १५,७७९ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असून ३० सप्टेंबर पर्यंत सुमारे १,५०,२५६ इंजेक्शन उपलब्ध होणार असल्याची माहिती उत्पादकांनी दिली. त्यामुळे येत्या काळात वितरण नियोजन योग्य रितीने केल्यास तुटवडा भासणार नाही.नियंत्रणासाठी विशेष कंट्रोल रुमकोविड-१९ चा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांसाठी अन्न व औषध पुरवठा विभागाने विशेष कंट्रोल रूम स्थापन केली आहे. याद्वारे आॅक्सिजन पुरवठ्याच्या नियंत्रणासह आता रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी आणि पुरवठा नियंत्रित केला जाणार आहे. राज्यात कोणत्याही जिल्ह्यात आॅक्सिजनची आवश्यकता असल्यास त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक हे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मागणी नोंदवितात. जवळच्या पुरवठादाराकडून आॅक्सिजन तातडीने त्या जिल्ह्याला उपलब्ध करून दिला जातो. या कंट्रोल रूममध्ये अन्न व औषध प्रशासन विभागासह आरोग्य विभाग आणि उद्योग विभागाचे संबंधित अधिकारी समन्वय साधत असतात. यासाठी टोल फ्री क्रमांक १८ ०० २२२ ३६५ तसेच ०२२ २६५९२३६४ हा लॅण्डलाइन क्रमांक कार्यान्वित आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या