Join us  

विकास आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 5:05 AM

मुंबईचा २०३४ सालापर्यंतच्या नवीन विकास आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे.

मुंबई : मुंबईचा २०३४ सालापर्यंतच्या नवीन विकास आराखड्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली आहे. नगरविकास विभागाने शुक्रवारी याबाबत शुद्धीपत्रक काढत १ सप्टेंबर २०१७ पासून विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.शासन अथवा मुंबई पालिकेच्या संकेतस्थळावर विकास आराखडा अपलोड करण्यात आला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना हरकती व सूचना दाखल करता आल्या नाहीत. त्यामुळे विकास आराखड्याच्या अंमलबजावणीस मुदतवाढ देणे आवश्यक असल्याचे नगर विकास विभागाने स्पष्ट केले. शुद्धीपत्रकानुसार आता १ सप्टेंबर २०१७ पासून आराखडा अंमलात येणार आहे. शिवाय, सूचना व हरकतींसाठी पालिका मुख्य अभियंता (विकास आराखडा), उपसंचालक नगर नियोजन यांच्या कार्यालयात आराखडा ठेवण्यात यावा, असे निर्देश या शुद्धीपत्रकात देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे शिवसेना नेत्यांनी बुधवारीच मराठीतून विकास आराखडा देण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठीतील विकास आराखड्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. शिवसेनेने मराठीचा मुद्दा पुढे करत विकास आराडखड्याला विरोध दर्शविला होता. सरकारच्या धोरणांमुळे महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्था कमकुवत होत असल्याचाही आरोप केला होता.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका