Join us  

खासगी कोचिंग क्लासला ग्राहक मंचाने दिला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 3:42 AM

एक लाखाची नुकसानभरपाई । दिलेल्या आश्वासनांचे पालन करणे हे क्लासेसचे कर्तव्य

मुंबई : कोचिंग क्लासला शाळांप्रमाणे दर्जा नसला तरी मुलांना यशस्वीरीत्या स्पर्धात्मक परीक्षांत उत्तीर्ण करण्याइतके समर्थ करणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनी क्लासेसमध्ये प्रवेश घेताना त्यांना दिलेल्या सर्व आश्वासनांचे पालन करणे, हे कोचिंग क्लासेसचे कर्तव्य आहे, असे निरीक्षण नोंदवत औरंगाबाद ग्राहक मंचाने एका कोचिंग क्लासला सेवेत कमतरता केल्याबद्दल तक्रारदार विद्यार्थिनीला एक लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.औरंगाबाद येथील एका स्थानिक कोचिंग क्लासेसने निट परीक्षेसाठी प्रवेश घेतलेल्या एका विद्यार्थिनीकडून फी म्हणून एक लाख रुपये आकारून तिला वेळेवर नोट्स दिल्या नाहीत. तसेच परीक्षेसाठी सरावही करून न घेतल्याने मुलीच्या पालकांनी फीचे पैसे परत मिळावे, यासाठी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.

क्लासने केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला. मात्र शिकविलेले विद्यार्थ्यांना समजले की नाही, याची खात्री करून घेतली नाही. तसेच आश्वासन दिल्याप्रमाणे नोट्सही दिल्या नाहीत. अशाच पद्धतीने शिकविणे सुरू राहिले, तर आपण नापास होऊ, अशी भीती विद्यार्थिनीला वाटली. त्यामुळे तिने अन्य कोचिंग क्लासला प्रवेश घेणे योग्य समजले, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.

‘विद्यार्थ्यांकडून फी म्हणून मोठे शुल्क आकारणाऱ्या कोचिंग क्लासेसने केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देऊ नये. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण करण्याइतपत समर्थ करणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना त्यांना दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणे, हे या कोचिंग क्लासेसचे कर्तव्य आहे. या केसमध्ये कोचिंग क्लासेस त्यांचे आश्वासन पाळण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे विद्यार्थिनीला तिने फी म्हणून भरलेले १ लाख रुपये परत करण्यात यावे,’ असा आदेश ग्राहक मंचाने संबंधित कोचिंग क्लासला दिला. 

काय म्हणाले न्यायालय?‘स्पर्धात्मक परीक्षा देण्यास इच्छुक असलेले बहुतांशी विद्यार्थी कोचिंग क्लासेस लावतात. क्लास आपल्याला वेळेवर तयार नोट्स देतील. तसेच सतत सराव घेऊन आपल्याला परीक्षेसाठी तयार करतील, या विचाराने पालक भलीमोठी फी भरतात,’ असे निरीक्षण ग्राहक मंचाने नोंदविले. ‘अशा स्थितीत कोचिंग क्लासेसने कठीण विषयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच शिकवलेले विद्यार्थ्यांना समजेल याची काळजी घेतली पाहिजे. क्लासेसना शाळेचा दर्जा नसला तरी या दोन्ही संस्थांचा उपक्रम एकच आहे,’ असे निरीक्षणही मंचाने नोंदविले.