'नरेंद्र मोदींच व्यक्तीमत्व प्रेरणादायी, मी त्यांचा आदर्श घेतो पण...'; सोनू सूदने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:35 PM2020-06-18T14:35:25+5:302020-06-18T14:38:06+5:30

संजय राऊत यांनी जे सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिलं होतं, ते खरं नव्हतं, असं देखील सोनू सूदने सांगितले आहे.

Prime Minister Narendra Modi's personality is inspiring, said Bollywood actor Sonu Sood. | 'नरेंद्र मोदींच व्यक्तीमत्व प्रेरणादायी, मी त्यांचा आदर्श घेतो पण...'; सोनू सूदने केला मोठा खुलासा

'नरेंद्र मोदींच व्यक्तीमत्व प्रेरणादायी, मी त्यांचा आदर्श घेतो पण...'; सोनू सूदने केला मोठा खुलासा

googlenewsNext

मुंबई:  लॉकडाऊनदरम्यान आपल्या गावी परतत असलेल्या परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी पुढे आल्याने अभिनेता सोनू सूद चर्चेत आला आहे. आतापर्यंत हजारो परप्रांतीय मजुरांना, कामगारांना सोनू सूदने त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. मात्र  काही राजकीय मंडळी सोनू सूदचा मुखवटा वापरून ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. 

संजय राऊत यांच्या या टीकेनंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. मात्र या भेटीमध्ये नेमकं कोणत्या विषयावर चर्चा झाली याबाबतचा खुलासा सोनू सूदने 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर सोनू सूद म्हणाला की, या संपूर्ण वादाची मला काहीच कल्पना नव्हती. मात्र काही लोकांनी फोन करण्यास सुरुवात केल्यानंतर मला या प्रकरणाबाबत समजले. काँग्रेसचे नेते अस्मल शेख माझे चांगले मित्र असून त्यांचाही मला फोन आला. तुला यावर काही स्पष्टीकरण द्यायचं आहे का, असं त्यांनी मला विचारलं. तसेच उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा आहे का असं विचारल्यानंतर मी देखील भेटण्यासाठी सहमती दर्शवल्याचे सोनू सूदने सांगितले.

संजय राऊत यांनी जे सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिलं होतं, ते खरं नव्हतं. तसेच उद्धव ठाकरे यांना देखील हे योग्य वाटलं नसल्याचं सोनू सूदने सांगितले आहे. या बैठकीत आपण सर्वजण स्थलांतरितांना मदत करत आहोत हाच निष्कर्ष निघाला. उद्धव ठाकरेंनी माझ्या कामाचं कौतुक केलं, तसंच लागेल ती मदत करण्याचं आश्वासनही दिलं, असं सोनू सूद यांनी सांगितले.

सोनू सूदने या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील उल्लेख केला. नरेंद्र मोदी सर्वसामान्य लोकांशी ज्या पद्धतीनं जोडले जातात ते मला खूप आवडतं. तसेच नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. मी देखील त्यांचा आदर्श घेतो. मात्र याचा अर्थ असा होत नाही की मी भाजपात प्रवेश करणार आहे, असं स्पष्टीकरण देखील सोनू सूदने दिलं आहे.

स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी पाठविण्याच्या कामात सोनू सूद यांनी हिरिरीने पुढाकार घेतला होता. याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुकही होत होते. स्वतः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही सूद यांना राजभवनावरून बोलावून सूद यांचे कौतुकही केले होते. संजय राऊत यांनी सोनू सूद यांच्यावर टीका करणारा लेख शिवसेनेच्या मुखपत्रात छापला होता. संजय राऊत यांच्या भूमिकेमुळे राजकीय वादंगाला सुरूवात झाली होती. यानंतर सोनू सूदने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?

भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे.

पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत. त्यामुळे मजुरांचे दुःख वगैरे पाहून सूद महाशय भावनाविवश झाले, त्यांच्यातल्या माणुसकीची ज्योत फडफडू लागली, यावर कोणी शहाणा माणूस विश्वास ठेवायला तयार नाही. कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय? अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली.

Web Title: Prime Minister Narendra Modi's personality is inspiring, said Bollywood actor Sonu Sood.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.