मुंबई : मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने पावसाळापूर्व तयारी सुरू केली आहे. मुंबईतील विविध ६७ यंत्रणांच्या परिसरातील २९ हजार १९ पाण्याच्या टाक्यांपैकी २२ हजार ५६८ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. तर ६ हजार ४५१ पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना प्रलंबित आहेत. टाक्या डास प्रतिबंधक करण्याचे काम ७७.७७ टक्के पूर्ण झाले आहे, तर २२.२३ टक्के टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही शिल्लक असल्याची माहिती कीटकनाशक विभागाने दिली.
पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. कीटकनाशक विभागाकडून पावसाळापूर्व तयारीसाठी उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. मुंबई शहर परिसरात काही विभाग हे डेंग्यू आणि हिवतापाचे हॉटस्पॉट ठरू शकतात. त्याअनुषंगानेच विभागीय पातळीवर व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून विभागातील संबंधित यंत्रणांना सहभागी करून घ्यावे. विविध यंत्रणा आणि पालिकेच्या संयुक्त मोहिमेतून डास प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या.
गतवर्षी (२०२३) हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा पाहता यंदा अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामध्ये शहरी भागातील विविध यंत्रणांचा सक्रिय सहभाग रुग्णसंख्या कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी सादरीकरण करून उपाययोजना आणि सद्य:स्थितीचे सादरीकरण केले.कीटकनाशक विभागाच्या उपाययोजना
- गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये कीटकनाशक विभागाकडून तपासणी करण्याच्या तसेच पदाधिकाऱ्यांना किंवा मालकांना त्यांच्या वास्तू परिसरात डेंग्यू, हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इन्डोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी केली जाणार आहे.
- झोपडपट्टी भागात पाण्याच्या टाक्या झाकून ठेवण्याबाबत तसेच अडगळीतील जागेच्या वस्तू काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे. डेंग्यू आणि चिकुनगुनिया प्रसारक (एडिस) डासांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.