Join us  

प्रवीणसिंह परदेशी यांची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

By सचिन लुंगसे | Published: March 21, 2023 11:19 AM

ते सध्या या संस्थेचे  उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.  

मुंबई : प्रवीणसिंह परदेशी भा.प्र.से. निवृत्त जेष्ठ सनदी अधिकारी यांची भारतातील सर्वात प्राचीन व प्रख्यात अश्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) या संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

ते सध्या या संस्थेचे  उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.  BNHS चा गव्हर्निंग कौन्सिलने आता त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य रोहन भाटे, डॉ. आसद रहमानी,  डॉ. जयंत वडतकर,   उषा लचुंगपा, डॉ.अनिश अंधेरिया , केदार गोरे , पिटर लोबो , कुलोज्योती लाखर , डॉ रघुनंदन चुंडावत, डॉ. शुभालक्ष्मी, डॉ. परवेश पांड्या, उपाध्यक्ष श्लोका नाथ,  कोषाध्यक्ष कुंजन गांधी यांनी परदेशी यांची एकमताने निवड केली.

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS), भारतातील  वन्यजीव संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून ती 1883 पासून  मागील १४० वर्षांपासून निसर्ग संवर्धनासाठी भारतात व भारताबाहेर मोठे काम करीत आहे.अनेक पक्षी व वन्यजीव संशोधन, निसर्ग शिक्षण आणि जनजागृतीवर आधारित कृतीद्वारे निसर्गाचे संवर्धन, प्रामुख्याने जैविक विविधता वाचवणे हे संस्थेचे धेय आहे.

BNHS ही धोक्यात असलेल्या प्रजाती आणि अधिवासांच्या संवर्धनात उत्कृष्ट कार्य करणारी, स्वतःचे स्वातंत्र्य शास्त्रीय मत असलेली भारतातील अत्यंत प्रमुख अशी वैज्ञानिक संस्था आहे.

प्रवीणसिंह परदेशी पूर्वीपासूनच वन्य जीव प्रेमी म्हणून ओळखले जाते. तसेच त्यांनी जगातील अनेक देशांमधील वन्यजीव व्यवस्थापनाचा खोलवर अभ्यास केला आहे.परदेशी यांच्या नियुक्ती मुळे निसर्ग संवर्धन व संशोधन क्षेत्रात BNHS संस्था  आता एका नव्या शिखरावर जाऊन पोहचेल ह्याबाबत शंका नाही असे मत संस्थेचे मानद सचिव किशोर रिठे यांनी व्यक्त केले आहे.

BNHS सारख्या भारतातील अगरण्य अशासकीय संस्थेस आता त्यांच्या अध्यक्षपदी निवडलेमुळे परदेशी यांच्या मोठ्या अनुभवाचा फायदा संस्थेस नवीन शिखरावर पोहचण्यासाठी नक्कीच होणार आहे असे BNHS चे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तथा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी व्यक्त केले

प्रवीण परदेशी 1985 च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत.

परदेशी यांनी प्रशासकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत विविध पदं भूषवली आहेत.

परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात (UNO) ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिलंय.

त्यांनी मुंबई महापालिकेत 2019 मध्ये आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती.

त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, वन, पर्यावरण, अर्थ, नगरविकास तसंच महसूल या महत्त्वांच्या खात्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे.

प्रवीण परदेशी यांनी केंद्रात पंतप्रधान कार्यालयात गठित राष्ट्रीय क्षमता आयोगाच्या सदस्यपदी  काम पाहिले आहे.

तसेच नुकतेच त्यांची राज्याच्या निती आयोगाच्या म्हणजेच महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन- मित्र (Maharashtra Institute for Transformation- MITRA) या संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबई