Join us  

वॉटर बस धावण्याची शक्यता वाढली

By admin | Published: February 04, 2015 3:12 AM

मुंबईतील समुद्रात वॉटर बस (पाण्यात आणि जमिनीवरून धावणारी बस) संकल्पना राबविण्यासाठी एमटीडीसीने (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) त्याचा प्रथम अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबईतील समुद्रात वॉटर बस (पाण्यात आणि जमिनीवरून धावणारी बस) संकल्पना राबविण्यासाठी एमटीडीसीने (महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ) त्याचा प्रथम अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका खासगी कंपनीकडून त्याचा अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी येत्या १० दिवसांत निविदा काढली जाणार आहे. मुंबई शहर व उपनगरांत मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे दिवसभर मुंबईतील रस्त्यांवर वाहतूककोंडीचे चित्र दिसते. मुंबईला लाभलेला भलामोठा समुद्रकिनारा पाहता त्याच्याकडे वाहतुकीचा पर्याय म्हणून अद्यापतरी पाहण्यात आले नव्हते. आता मात्र गेल्या वर्षभरापासून मुंबईतील समुद्रात वॉटर बस ही संकल्पना राबविली जाऊ शकते का याचा विचार केला जात असून, यासाठी एमटीडीसीनेच पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. वॉटर बस मुंबईतील समुद्रात व रस्त्यांवर कितपत धावू शकते, तसेच या बससाठी कोणता मार्ग योग्य आहे, या बसमुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकते का, असे अनेक प्रश्न मार्गी लावण्यास एमटीडीसीकडून प्रथम अभ्यास अहवाल तयार केला जाणार आहे. हा अहवाल एका खासगी कंपनीकडून तयार केला जाणार असून, यासाठी १० दिवसांत त्याचे काम सदर कंपनीला देण्यास निविदा काढली जाणार असल्याचे एमटीडीसीचे जनसंपर्क अधिकारी संजय ढेकणे यांनी सांगितले.