विजय मांडे ल्ल कर्जत
तालुका पंचायत समितीत सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षाने हातात हात घेतला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात सभापतीपद पडले परंतु शेकापला नशिबाची साथ न मिळाल्याने काहीच मिळाले नाही. हे असेच जिल्हा परिषद निवडणुकीतही झाले तर तेथेही सत्तेचा लगाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात येईल आणि हाच फॉम्र्युला विधानसभेला वापरल्यास जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघून 1999 सालच्या निवडणुकीच्या पुनरावृत्तीची शक्यता आहे. या सर्व घटनांमधून राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.
2012 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस वेगवेगळे लढल्याने कर्जत पंचायत समितीची सत्ता हस्तगत करण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस कमी पडली. किंबहुना जिल्हा परिषदेची सत्ताही ‘हाताने’ घालविली, त्यावेळी शिवसेना, शेकाप, आरपीआय अशी महायुती होती, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा अशी आघाडी कर्जत तालुक्यात होती. कॉंग्रेस पक्षाने स्वतंत्रपणो निवडणूक लढविली. त्याचा परिणाम राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता आणण्यात झाला नाही. महायुतीचे सहा तर आघाडीचे चार सदस्य निवडून आल्याने शिवसेनेचा सभापती आणि शेकापक्षाचा उपसभापती विराजमान झाला होता. या अडीच वर्षात सत्ता असूनही महायुतीच्या सदस्यांचे कधीच जमले नाही. अडीच वर्षानंतर सभापती - उपसभापती पदाची मुदत संपली आणि खरी राजकीय खलबते सुरू झाली. लोकसभेला शेतकरी कामगार पक्षाने महायुतीमधून बाहेर पडून मनसेच्या साथीने मावळ व रायगड मतदार संघात उमेदवार उभे केले, तेव्हाच पुढील निवडणुकांमध्ये काहीतरी वेगळे होणार अशी शंकेची पाल चुकचुकत होती. कर्जत पंचायत समितीत महायुतीतून शेकाप बाहेर पडला व राष्ट्रवादीबरोबर जायचे ठरवले आणि इकडे राष्ट्रवादीच्या सहकार्याने निवडून आलेल्या भाजपाच्या प्रकाश वारे यांनी त्यांची साथ सोडून शिवसेनेची साथ धरली. त्यामुळे पंचायत समितीत सभापतीपदाच्या व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत समसमान मते मिळाली. सुवर्णा बांगारे सभापतीपदी विराजमान झाल्या, मात्र उपसभापतीपदाच्या निवडणुकीत गौरकामत प्रभागातून कपबशी निशाणीवर निवडून आलेल्या शिवसेनेच्या मनोहर थोरवे यांचे नशीब बलवत्तर ठरले. या राजकीय घडामोडीमुळे सत्ता आल्याशिवाय पंचायत समितीची पायरी चढणार नाही, अशी गर्जना करणा:या आमदार सुरेश लाड यांची ही जिद्द पूर्ण झाली.