Join us  

‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम

By रेश्मा शिवडेकर | Published: March 19, 2024 6:57 PM

मुंबई, गुजरात आणि अहमदाबाद विद्यापीठांच्या संयुक्त संशोधनातील निष्कर्ष

मुंबई : महाराष्ट्रातल्या पुणे, ठाणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली या चार व गुजरातमधील सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद या तीन स्मार्ट सिटीमधील नागरिकांच्या अभ्यासातून ‘स्मार्ट सिटी अभियाना’चा नागरिकांवर सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे संयुक्त संशोधनाच्या निष्कर्षातून पुढे आले आहे. तसेच नागरिकांचा लक्षणीय सकारात्मक प्रतिसाद पाहता जून २०२४ नंतरही हे अभियान सुरु ठेऊन, अधिक शहरातील नागरिकांना त्याचा लाभ मिळावा, अशी शिफारस देखील करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाची अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन अभ्यास संस्था, गुजरात विद्यापीठ आणि अहमदाबाद विद्यापीठ येथील ६ प्राध्यापकांनी केलेल्या संयुक्त संशोधन प्रकल्पातून हे निष्कर्ष पुढे आले आहेत. आयसीएसएसआरने प्रायोजित केलेल्या ‘नागरिकांच्या  दृष्टीकोनातून स्मार्ट सिटीज मिशनच्या प्रभावाचे मॅपिंग’ या संयुक्त संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण ११ मार्चला मुंबई विद्यापीठात आयोजित केलेल्या ‘स्पेशल कॉल फॉर एम्पिरिकल रिसर्च प्रोजेक्ट्स’ या कार्यशाळेत करण्यात आले. 

अल्केश दिनेश मोदी वित्तीय व व्यवस्थापन अभ्यास संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यशाळेसाठी स्मार्ट शहरातील मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासक, भागधारक, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या प्रकल्पासाठी २ हजाराहून अधिक उत्तरदात्यांचा अभ्यास केला गेला. उत्तरदात्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, व्यवसाय मालक, उद्योजक, शहर वास्तूविशारद, गृहिणी, दिव्यांग व्यक्ती आणि विद्यार्थी यांचा समावेश होता. या अभ्यासात स्मार्ट शहरांच्या उपक्रमांबद्दल नागरिकांच्या धारणा ८ स्मार्ट सिटी निर्देशांकावर मॅप केल्या. ज्यामध्ये स्मार्ट अर्थव्यवस्था ( नाविन्यता आणि उद्योजकता), स्मार्ट गव्हर्नन्स, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट मोबॅलिटी, स्मार्ट लिव्हींग, स्मार्ट लोकं, संस्कृती वारसा व पर्यटन आणि शाश्वत विकास लक्ष्ये यांचा समावेश होता. 

स्मार्ट सिटी अभियान धोरणाचा स्मार्ट शहरांच्या राहणीमान, आर्थिक क्षमता आणि शाश्वतेवर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे नागरिकांच्या दृष्टिकोनातून केलेल्या या अभ्यासात उघड झाले. पुणे, ठाणे, अहमदाबाद, सुरत, कल्याण-डोंबिवली या स्मार्ट शहरांमध्ये ‘स्मार्ट सिटीज अभियाना’च्या अंमलबजावणीतील काही उल्लेखनीय सामर्थ्यांवर प्रकाश टाकण्यात आला. महाराष्ट्रातील चार स्मार्ट शहरांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासकांनी धोरण शिफारशींसाठी या संशोधन निष्कर्षांच्या उपयुक्ततेचे कौतुक केले.

टॅग्स :स्मार्ट सिटीमुंबई