Join us  

‘विविध प्रकल्पांमुळे पोर्ट ट्रस्टला चांगले दिवस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 2:05 AM

मुंबई बंदराचा कायापालट होत असून, विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई पोर्ट ट्रस्टला चांगले उत्पन्न मिळणार आहे़ त्यामुळे बंदर बंद होण्याची भीती अनाठायी असल्याचे मत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केले.

मुंबई : मुंबई बंदराचा कायापालट होत असून, विविध प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई पोर्ट ट्रस्टला चांगले उत्पन्न मिळणार आहे़ त्यामुळे बंदर बंद होण्याची भीती अनाठायी असल्याचे मत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल, वॉटर ट्रान्सपोर्ट, जवाहरद्वीपचा विकास अशा प्रकल्पांमुळे मुंबई पोर्ट ट्रस्टला चांगले दिवस येतील, असे ते म्हणाले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉइज युनियनतर्फे डॉ. शांती पटेल यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते. मुंबई पोर्ट ट्रस्ट बंद होणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.मुंबई बंदरात यंदा ६३ दशलक्ष टन मालाची चढ-उतार झाली. ट्रस्टच्या ३४ हजार निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी वर्षाला ९०० कोटी रुपयांचा खर्च होतो. जवाहरद्वीप व पीरपाव येथील जेटीपासून बंदराला चांगले उत्पन्न मिळणार आहे. जवाहरद्वीप येथे रेक्लेमेशनची परवानगी मिळाली आहे़ तेथे तेलासाठी नवीन टाक्या बांधण्यात येतील, अशी माहिती भाटिया यांनी दिली. गेल्या वर्षी ४६ क्रुझ शीप आल्या. यंदा १०६ येणार असून, पुढील वर्षी २४६ जहाजे येणार आहेत. भविष्यात दरवर्षी १ हजार जहाजे येतील, असे ध्येय आहे. या माध्यमातून देशभरात ३० लाख प्रवासी प्रवास करतील व त्यामध्ये ८० टक्के प्रवासी मुंबई बंदरातून प्रवास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पेन्शन फंडात सध्या ३,५०० कोटींची तूट आहे. माझगाव डॉककडून ८५० कोटी व गोवंडी येथील जागेतून ३,५०० कोटी मिळाल्यास ती रक्कम पेन्शन फंडात भरण्यात येईल. ५८६ हेक्टर जमिनीवर हायटेक फायनान्स शहर उभारण्यात येणार आहे. त्यामधून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे भाटिया म्हणाले.युनियनचे अध्यक्ष अ‍ॅड एस.के.शेट्ये म्हणाले, ‘हे बंदर वाचणे आवश्यक आहे. कामगारांना बंदराच्या स्थितीची जाणीव आहे. कोणताही निर्णय त्यांना विश्वासात घेऊन घेतला जावा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. यतीन पटेल, संजय वढावकर, मारुती विश्वासराव, विद्याधर राणे, विजय रणदिवे उपस्थित होते.