नामदेव मोरे, नवी मुंबईनिवडणूक विभागाने अंतिम यादी जाहीर केली तरी मतदारसंख्येचा घोळ अद्याप संपलेला नाही. शहरातील ९ प्रभागांमध्ये एकूण लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त असल्याचे उघड झाले आहे. लोकसंख्येपक्षा मतदार वाढले कसे याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात असून यामुळे निवडणुकीमध्ये बोगस मतदान होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. नवी मुुंबई महापालिका निवडणुकीसाठी यावेळी गुगल मॅपच्या सहाय्याने प्रभाग रचना करण्यात आली. यानंतरही त्यात अनेक त्रुटी राहिल्या. नागरिकांनी घेतलेल्या आक्षेपानंतर अनेक ठिकाणी बदल करण्यात आले आहेत. मतदार यादीमध्येही अनेक त्रुटी राहिल्याने तब्बल ९४६ आक्षेप नोंदविण्यात आले होते. याची छाननी करून आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्येही अनेक त्रुटी राहिल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करू लागले आहेत. प्रभाग रचना करताना प्रत्येक प्रभागामध्ये साधारणत: ५ ते ७ हजार मतदार असतील, असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी मोठी विसंगती आहे. घणसोलीमधील प्रभाग ३४ व ३५ मध्ये अनुक्रमे २५८८ व ३२७२ एवढे कमी मतदार आहेत. ९ प्रभागांमध्ये तेथील लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत. बेलापूर प्रभाग क्र.१०२ मध्ये लोकसंख्या ९७४७ असून मतदार तब्बल १०००२ एवढे आहेत. लोकसंख्येपेक्षा १७५८ मतदार जास्त आहेत. वाशी प्रभाग क्र.६४ मध्ये लोकसंख्या ११,३६९ असून मतदार १२७०२ एवढे आहेत. या व्यतिरिक्त प्रभाग ४५, ५८, ६०,६१, ६२, ६३, १०४ या प्रभागांमध्येही मतदारांची संख्या जास्त आहे. लोकसंख्येपेक्षा मतदार जास्त कसे, याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेना नगरसेवक विठ्ठल मोरे यांनी या गंभीर बाबीकडे निवडणूक अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधून यादीमध्ये मोठ्याप्रमाणात चुका असल्याचे निदर्शनास आणले होते. वाशीमधील काँगे्रसचे कार्यकर्ते विजय वाळूंज यांनीही परिसरामध्ये बोगस मतदार असल्याचा आक्षेप घेतला होता. बोगस मतदार वगळण्यासाठी पाठपुरावाही केला होता. मतदारांची जास्तीची संख्या पाहिल्यानंतर त्या परिसरात वास्तव्यास नसलेल्यांचीही नावे मतदार यादीमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात असून यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. वास्तविक लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी बीएलओ (बुथ लेव्हल आॅफिसर) नेमले होते. तिन्ही वेळेला समान कर्मचारी होते. त्यांनी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून वस्तुस्थिती पाहिली असती तर कदाचित मतदार याद्यांमध्ये घोळ राहिले नसते, असे जाणकारांचे मत आहे. यामुळे या प्रकारास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर निवडणूक आयोग काय कारवाई करतो, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या जास्त
By admin | Updated: April 1, 2015 00:31 IST