Join us  

पूर्व उपनगरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 6:26 AM

चेंबूर, कुर्ला, टिळकनगर, गोवंडी, मानखुर्द व घाटकोपर या परिसरामध्ये अनेक छोट्यामोठ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे.

- ओमकार गावंडमुंबई : मुंबई महानगरपालिकेने खड्डेमुक्त मुंबई असा दावा केला असला तरीही मुंबईत खड्डे दिवसेंदिवस वाढतच आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना खड्ड्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पूर्व उपनगरात अनेक महत्त्वाच्या व मोठ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. दाट लोकवस्तीला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांचीही खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे.चेंबूर, कुर्ला, टिळकनगर, गोवंडी, मानखुर्द व घाटकोपर या परिसरामध्ये अनेक छोट्यामोठ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. सायन-पनवेल मार्ग तसेच घाटकोपर व मानखुर्द विभागांना जोडणाºया जिजाबाई भोसले मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या मार्गांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या मार्गांवर खड्डे पडायला सुरुवात झाली.नागरिकांनी केलेल्या तक्रारींमुळे यातील अनेक खड्डे बुजविले, मात्र हे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजविल्यामुळे या खड्ड्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यामुळे वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. खड्ड्यांमधील माती रस्त्यावर पसरल्याने दुचाकीस्वार घसरून त्यांचा अपघात होत आहे. सायन-पनवेल मार्गावर सायन येथून पुढे येताच एव्हरार्ड नगर, प्रियदर्शनी, सुमननगर, उमरशी बाप्पा चौक, डायमंड गार्डन, देवनार, मानखुर्द सिग्नल येथे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.जिजाबाई भोसले मार्गाचीही खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. शिवाजीनगर, बैंगनवाडी, मानखुर्द सिग्नल व घाटकोपर सिग्नल येथील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक जास्त असल्याने येथे खड्ड्यांमुळे एखाद्या मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.मी स्वत: माझ्या सहकाऱ्यांसह ‘पॉटहोल वॉरियर्स’ या मोहिमेअंतर्गत दरवर्षी मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवितो. मुंबई महानगरपालिका तेच खड्डे बुजविते जे खड्डे नागरिक निदर्शनास आणून दाखवितात. पालिकेकडून स्वत:हून खड्डे बुजविले जात नाहीत. पालिका खड्डे बुजविताना ते कायमस्वरूपी न बुजवता केवळ तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करते. त्यामुळे बुजविलेले खड्डे काहीच दिवसात पुन्हा एकदा डोके वर काढतात.- मुश्ताक अन्सारी, खड्ड्यांच्या समस्येचे अभ्यासक

टॅग्स :मुंबई