Join us  

लखनऊ, दिल्लीतील प्रदूषणाची पातळी अपेक्षित मर्यादेपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:05 AM

टाळेबंदीतील अभ्यास; मुंबईच्या प्रदूषणातही दरवर्षी वाढलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे २०२० आणि २०२१ ...

टाळेबंदीतील अभ्यास; मुंबईच्या प्रदूषणातही दरवर्षी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविडमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे २०२० आणि २०२१ या वर्षात देशभरातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे. मात्र, क्लायमेट ट्रेण्ड्सने केलेल्या अभ्यासानुसार लखनऊ आणि दिल्ली येथे प्रदूषण पातळी अपेक्षित मर्यादेपेक्षा अधिक दिसून आली. तर, मुंबईच्या वातावरणातील पीएम २.५ चे प्रमाण मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत वाढत असल्याचे चित्र दरवर्षी आहे. दुसरीकडे कोलकाता येथे मात्र २०१९ ते २०२१ या काळात मार्च, एप्रिल, मे या कालावधीत हवेचा दर्जा सुधारला.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार पीएम २.५चे (२.५ मायक्रॉन आकाराचा सूक्ष्मकण) सुरक्षित प्रमाण ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यातील हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीच्या आधारे दिल्ली, लखनऊ, मुंबई आणि कोलकाता या शहरांतील टाळेबंदीपूर्वीची २०१९ सालची हवेची गुणवत्ता आणि २०२०, २०२१ या टाळेबंदीच्या वर्षातील हवेच्या गुणवत्तेचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. अभ्यासातील निष्कर्षानुसार मुंबई वगळता इतर शहरांमध्ये पीएम २.५ च्या सरासरीमध्ये २०२० या वर्षात घट दिसून आली. मुंबईतील पीएम २.५ चे सरासरी प्रमाण मार्च ते मे २०१९ या काळात २१.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते. त्यात वाढ होऊन २०२० साली हे प्रमाण ३१.३ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर व २०२१ मध्ये ४०.३ मायक्रोग्रॅम प्रतिघननीटरपर्यंत गेले.

* तौक्तेसारख्या चक्रीवादळांमुळे वातावरण स्वच्छ होण्यास मदत

मुंबई समुद्रकिनारी वसलेली असल्याने स्थानिक वातावरण, वादळांमुळे वातावरणात होणारे बदल यांचा एकत्रित परिणाम जाणवतो. वाऱ्याचा वेग कमी असल्यास निर्माण होणाऱ्या अनुकूल स्थितीमुळे शेजारच्या राज्यांतून येणारी प्रदूषके वातावरणात साचून राहतात. मात्र, तौक्तेसारख्या चक्रीवादळांमुळे वातावरण स्वच्छ होण्यास मदत होते.

- प्रा. एस. के. ढाका, राजधानी महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ

* प्रदूषणाचे प्रमाण अद्याप जास्तच

टाळेबंदीमुळे वाहनांची वर्दळ कमी झाली. परिणामी, इंधनाचा वापरही कमी झाला. औद्योगिक आस्थापनाही बंद हाेत्या. मात्र, तरीही यावर्षी प्रदूषणाचे प्रमाण अद्याप जास्तच आहे. २०१७ नंतर पीएम १० च्या प्रमाणात घट होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पीएम २.५ आणि पीएम १० चे सर्व प्रदेशांतील प्रमाण यावर्षी अधिकच दिसून येत आहे.

- डॉ. जी. सी. किस्कू,

प्रमुख शास्त्रज्ञ, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टॉक्सिकोलॉजी रिसर्च

* आरोग्यास असणाऱ्या धोक्यांबाबत जागरूक असणे गरजेचे

टाळेबंदीत हवेच्या प्रदूषणात झालेली घट समप्रमाणात आणि सातत्यपूर्ण नाही. त्यामुळे प्रदूषणाच्या उच्च पातळीला मानवी सक्रियता कारणीभूत असल्याचे खात्रीने म्हणता येणार नाही. त्यामुळे आरोग्याला असणाऱ्या धोक्यांबाबत जागरूक असले पाहिजे.

- डॉ. अरुण शर्मा, अध्यक्ष,

सोसायटी फॉर इनडोअर एन्व्हायर्न्मेंट

दिल्ली

- पीएम २.५ चे तीन महिन्यांचे सरासरी प्रमाण २०१९ साली ९५.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते.

- त्यात घट होऊन हे प्रमाण २०२० साली ६९ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर इतके आढळले.

- २०२१ साली पुन्हा हे प्रमाण ९५ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत वाढले.

कोलकाता

- पीएम २.५ चे प्रमाण २०१९ साली ४१.८ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते.

- २०२० साली ते २७.९ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत घटले.

- २०२१ साली पुन्हा वाढ होऊन हे प्रमाण ३७.३ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर झाले.

- २०२० साली संपूर्ण टाळेबंदी होती.

- २०२१ साली कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आरोग्य सुविधांच्या शोधात अनेक नागरिक घराबाहेर पडले.

- पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकांमुळेही नागरिक घराबाहेर पडले.

लखनऊ

- पीएम २.५ चे प्रमाण २०१९ पासून सातत्याने घटत आहे.

- मात्र अजूनही हे प्रमाण अपेक्षित मर्यादेपेक्षा अधिकच आहे.

- मार्च, एप्रिल, मे या कालावधीतील पीएम २.५ चे प्रमाण २०१९ साली १०३ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर होते.

- त्यात घट होऊन ते २०२० साली ९२ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत खाली आले.

- २०२१ साली ते आणखी कमी होऊन ७९.६ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटरपर्यंत खाली आले.

* प्रदूषणाचे स्रोत

- बांधकाम, औद्योगिक कामे, वीटभट्ट्या आणि वाहने हे स्रोत पूर्णत: बंद होते. घरगुती वायू, आग, डिझेल निर्मिती, धूळ, कोळशावरील विद्युतनिर्मिती केंद्रे हे स्रोत कमी क्षमतेने सुरू होते.

-----------------------------