मराठी मुलगी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमी - मनसेमध्ये जुंपली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 12:44 PM2020-06-29T12:44:06+5:302020-06-29T12:46:37+5:30

मराठी तरुणीला परिसर सोडण्याच्या धमक्या; तरुणीच्या मदतीला मनसे सरसावली

politics takes heat between mns and abu azmi after marathi girl raised voice against loudspeakers on mosques | मराठी मुलगी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमी - मनसेमध्ये जुंपली!

मराठी मुलगी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमी - मनसेमध्ये जुंपली!

googlenewsNext

मुंबई: मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणीला धमक्या दिल्या जात असल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली आहे. करिश्मा भोसले नावाच्या तरुणीनं मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र मशीद परिसरातील व्यक्तींनी तिला विरोध करत वाद घातला. यानंतर तिला धमक्या देण्यात आल्या. यावरून आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि मनसे यांच्यात जुंपली आहे. 

करिश्मा भोसलेनं मशीद परिसरात नेमकं काय घडलं, याची माहिती देणारा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर केला आहे. '२४ जूनला दुपारी ३ वाजता मी मशीद परिसरात गेले होते. त्यांनी मला पाच वाजता येण्यास सांगितलं. मी तिथे जाऊन त्यांना भोंग्याचा आवाज कमी करण्याची विनंती केली. मात्र त्यांनी वाद घातला. आमचं कोणासोबत शत्रुत्व नाही. अझानलाही आमचा विरोध नाही. पण लाऊडस्पीकरवरील अझानला विरोध आहे,' अशा शब्दांत करिश्मानं तिची भूमिका स्पष्ट केली.



'या भागात हिंदू मुस्लिम सोबत राहतात. पण काही जण अझानच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण करत आहेत. आम्ही इथेच राहतो आणि इथेच राहणार आहोत. आम्ही सत्यासोबत असून संविधान आमच्यासोबत आहे. जे आम्हाला मदत करू इच्छितात, त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं. अनधिकृत लाऊडस्पीकरला विरोध करावा,' असं आवाहन तिनं केलं. करिश्मा भोसलेनं मशिदीतील काही व्हिडीओ ट्विट केले आहेत. यामध्ये तिचा काही मुस्लिम महिलांशी वाद होत असताना दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडीओत पोलीस करिश्मा आणि मुस्लिम व्यक्तींना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.





मशिदींवरील भोंग्यावरून मानखुर्दमध्ये राजकारणदेखील पेटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी करिश्मा भोसले यांच्या लढ्याला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. 'आम्ही करिश्माची भेट घेतली. या लढ्यात राज ठाकरे तिच्यासोबत असल्याचं आश्वासन दिलं. घर सोडण्यासाठी अबू आझमींसारखी माणसं तिला धमक्या देत आहेत. अशा फुटकळ लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. राज्यभरात मशिदीवर अनधिकृत भोंगे वाजतात. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. पण सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनींच पाळायचा का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदूंना नियम सांगितले जातात. मात्र इतर धर्मीयांना त्यामधून सूट दिली जाते. मशिदीवर पहाटे ४ वाजता भोंगे वाजतात. त्याचा त्रास इतरांना होत असतो. याविरोधात करिश्मानं आवाज उठवला आहे. तिला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला, तर गाठ महाराष्ट्र सैनिकांशी आहे, असा इशारा जाधव यांनी दिला.



'अबू आझमी यांनी मर्यादेत राहावं. अन्यथा महाराष्ट्र सैनिक त्यांना ठोकून काढतील. महाराष्ट्रात राहायचं असेल मर्यादेत राहायचं. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला धमकावण्याचा प्रयत्न करायचा नाही. महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रविरोधी गोष्टी करणं खपवून घेतलं जाणार नाही. आमदार असूनसुद्धा महिलेबद्दल अशी भाषा वापरणाऱ्या अबू आझमींना लाज वाटायला हवी. यापुढे कोणीही असा त्रास दिला तर खपवून घेणार नाही,' अशी धमकी त्यांनी दिली.

'आमच्या डीजेंवर, मंदिरांवर कारवाई झाल्यानंतर आम्ही गप्प बसायचं. मात्र अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जात नाही. यामध्ये पोलिसांचीही भूमिका दुटप्पी असते. प्रत्येक गोष्ट हिंदूंना समजवायला जातात. हिंदूंनी काय सर्वधर्मसमभाव जपण्याचा ठेका घेतला आहे का? अनधिकृत मंदिरांवर लगेच कारवाई होते. पण मशिदींवर, त्यांच्यावरच्या भोंग्यांवर कारवाई होत नाही. आता पोलीस प्रशासन कुठे गेलं आहे?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Read in English

Web Title: politics takes heat between mns and abu azmi after marathi girl raised voice against loudspeakers on mosques

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.