Nawab Malik : "टिपू सुलतान यांच्या नावावरुन भाजपा लोकांची दिशाभूल करतंय", नवाब मलिकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 01:00 PM2022-01-27T13:00:51+5:302022-01-27T13:08:07+5:30

Nawab Malik: 'टिपू सुलतान' नामकरणावरून भाजपा लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

Political Row On Naming Of Mumbai Sports Complex Of Tipu Sultan At Malad, NCP Nawab Malik Criticized On BJP | Nawab Malik : "टिपू सुलतान यांच्या नावावरुन भाजपा लोकांची दिशाभूल करतंय", नवाब मलिकांची टीका

Nawab Malik : "टिपू सुलतान यांच्या नावावरुन भाजपा लोकांची दिशाभूल करतंय", नवाब मलिकांची टीका

googlenewsNext

मुंबई : मुंबईत सध्या टिपू सुलतान (Tipu Sultan) नावावरून जोरदार राजकारण तापले आहे. मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान नाव देण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपामध्ये नवा वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Alslam shaikh) यांच्या आमदार निधीतून या संकुलाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'टिपू सुलतान' नामकरणावरून भाजपा लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक म्हणाले की, टिपू सुलतान यांचे नाव घेऊन भाजपा वाद निर्माण करुन जनतेची दिशाभूल करत आहे. टिपू सुलतान हे इंग्रज साम्राज्याशी लढताना शहीद झाले. त्यांनी कधीही इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. असे एक महान व्यक्ती, ज्यांनी इंग्रजांना हादरून ठेवले होते, त्यांचा नावाचा विरोध करण्याचे काम भाजपा करत आहे. तसेच, कर्नाटकामध्येही भाजपाने हीच परिस्थिती निर्माण केली होती. काही काळासाठी माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी काही काळासाठी टिपू सुलतान यांची जयंती साजरी केली होती. मात्र सत्ता आल्यानंतर विवाद निर्माण करण्यासाठी जयंतीचा कार्यक्रम रद्द केला, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

याचबरोबर,  याआधी 2013 मध्ये भाजपा नगरसेवकांनी अशाच प्रकारे टिपू सुलतान यांचे नाव देण्याची भूमिका घेतली होती, ही बाबही नवाब मलिक यांनी निदर्शनास आणून दिली. ते म्हणाले, मुंबईतील भाजपाच्या नगरसेवकांनी टिपू सुलतान यांच्या नामकरणासाठी पत्र दिले होते. एखाद्या मैदानचे नाव टिपू सुलतान यांच्या नावाने झाले तर ते घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपा करत आहे. याबाबतीत राष्ट्रपतींनीही संसदेत सभागृहाला संबोधित करत असताना टिपू सुलतान यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल दिलेली माहिती भाजपाच्या नेत्यांनी घेतली पाहिजे, असेही नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात येणार असल्याचे फलक परिसरात लागले होते. त्याचवेळी अस्लम शेख यांनी या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. या  क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजपा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी क्रीडा संकुलाबाहेरील परिसरात आंदोलनही केले होते. आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. यावर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Political Row On Naming Of Mumbai Sports Complex Of Tipu Sultan At Malad, NCP Nawab Malik Criticized On BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.