‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला स्थगितीमुळे पोलीस भरती रखडली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 07:06 AM2020-01-23T07:06:44+5:302020-01-23T07:07:08+5:30

राज्य पोलीस दलामध्ये विविध घटकांतील शिपाई पदासाठीच्या रिक्त आठ हजार जागांसाठी राज्यभरातून तब्बल १२ लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत.

 Police recruitment stalled due to postponement of 'MahaPortal' process | ‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला स्थगितीमुळे पोलीस भरती रखडली

‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला स्थगितीमुळे पोलीस भरती रखडली

Next

मुंबई : राज्य पोलीस दलामध्ये विविध घटकांतील शिपाई पदासाठीच्या रिक्त आठ हजार जागांसाठी राज्यभरातून तब्बल १२ लाख उमेदवारांचे अर्ज आले आहेत. मात्र त्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याने भरतीची प्रक्रिया रखडली आहे. यामुळे संबंधित उमेदवारांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याने ही भरती ‘आॅफलाइन’ घेण्याचा विचार गृह विभागाकडून करण्यात येत आहे.
कॉन्स्टेबल पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने राज्यातील बेरोजगारीचे भीषण वास्तव समोर आले आहे. मात्र महापोर्टलला स्थगिती दिल्याने भरतीचे भवितव्य धोक्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस घटकातील एकूण रिक्त जागांसाठी पोलीस भरतीची जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या महापोर्टलवरून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
निर्धारित कालावधीमध्ये त्यासाठी तब्बल १२ लाख अर्ज आले. मात्र अन्य पदांच्या ठिकाणी ‘महापोर्टल’ची अचूकता व विश्वासार्हतेबद्दल उमेदवारासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी साशंकता व्यक्त केली होती. राज्यात भाजपविरोधात महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर ‘महापोर्टल’च्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यामुळे पोलीस भरतीची प्रक्रियाही आपसूक रखडली आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याने ही भरती पूर्वीप्रमाणे ‘आॅफलाइन’ घेण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
मात्र, आॅफलाइन भरती प्रक्रिया किचकट ठरण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यासाठी पहिल्यांदा आलेले अर्ज, उमेदवारांनी जमा केलेली अनामत रक्कम संबंधितांच्या खात्यावर परत करावी लागेल, त्यानंतर पुन्हा अर्ज मागवून घेणे, खूपच क्लिष्ट व गुंतागुंतीचे काम होणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

Web Title:  Police recruitment stalled due to postponement of 'MahaPortal' process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.