Police recovered 3.55 lakh from Mumbai Indians | मुंबई इंडियन्सकडून पोलिसांनी वसूल केले ३.५५ लाख

मुंबई इंडियन्सकडून पोलिसांनी वसूल केले ३.५५ लाख

मुंबई - आयपीएल-१२ मधील विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने काढलेल्या विजयी रॅलीबद्दल माहिती अधिकार कायद्यांतर्गत विचारणा केल्यानंतर, मुंबई पोलिसांनी संघाच्या आयोजकाकडून ३ लाख ५५ हजार रुपये वसूल केले आहेत. अ‍ॅन्टालिया ते ट्रायडेंट हॉटेलपर्यंत काढलेल्या रॅलीला पुरविलेल्या पोलीस सरंक्षणाबद्दल ही रक्कम घेण्यात आली आहे. मात्र, रॅलीला परवानगी दिली होती का? याबाबत काहीही भाष्य करण्याचे टाळले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी या संदर्भात १६ मे रोजी मुंबई पोलीस व वाहतूक विभागाकडे ‘आरटीआय’अंतर्गत विचारणा केली होती. त्यावर सशस्त्र पोलीस
दलाच्या वतीने ३१ मे रोजी अंबानी समूहाच्या इंडिया विन कंपनीला पत्र पाठवून संरक्षण शुल्काची मागणी केली. एक सहायक निरीक्षक, तर प्रत्येकी दोन निरीक्षक व उपनिरीक्षक आणि १०० कॉन्स्टेबलचा बंदोबस्त रॅलीला पुरविण्यात आला होता. त्याबद्दल ३ लाख ५५ हजार
रुपयाचे शुल्क कंपनीकडून ४ जूनला देण्यात आले.

सायलेंट झोनमध्येही परवानगी दिली?
मात्र, ‘सायलेंट झोन’ असलेल्या ठिकाणी रॅली काढण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती का, याबाबत मुंबई पोलिसांनी खुलासा केलेला नाही, तसेच ‘आरटीआय’ केल्यानंतर शुल्काची मागणी करण्यात आलेली आहे, जर अर्ज केला नसता, तर कदाचित शुल्क घेण्याची तसदी पोलिसांनी दाखविली असती का, अशी विचारणा अनिल गलगली यांनी केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Police recovered 3.55 lakh from Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.