पोलिसांची ड्युटी आठ तासांची करणार - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:03 AM2019-08-20T06:03:33+5:302019-08-20T06:04:39+5:30

राज्यातील ५० हजार होमगार्डना पोलीस सेवेत कायम करण्याचे आश्वासनही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

Police duty will do eight hours - Prakash Ambedkar | पोलिसांची ड्युटी आठ तासांची करणार - प्रकाश आंबेडकर

पोलिसांची ड्युटी आठ तासांची करणार - प्रकाश आंबेडकर

Next

मुंबई : वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास पोलिसांची ड्युटी आठ तासांची करण्याबाबत कायदा करू. तसेच होमगार्ड यांना पोलीस सेवेत सामावून घेण्यात येईल, असे आश्वासन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या ड्युटीच्या तासांचा विषय वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. पोलिसांना युनियन काढता येत नाही; त्यामुळे त्यांच्याकडे सर्वच सरकारांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केला. तसेच राज्यातील ५० हजार होमगार्डना पोलीस सेवेत कायम करण्याचे आश्वासनही आंबेडकर यांनी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवेल. काँगेससोबत आघाडीस आम्ही तयार आहोत. त्यांना १४४ जागांचा प्रस्तावही दिला आहे. पण, तेच आघाडीसाठी पुढे येत नाहीत. विविध तपासयंत्रणांच्या दबावाखाली आलेले काँग्रेस नेते आघाडी करून भाजपविरोध करण्यापेक्षा वंचितला बदनाम करत आहेत, असा आरोप आंबेडकर यांनी केला. आम आदमी पक्षाबरोबर (आप) विधानसभेसाठी आघाडीची बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. वंचितचे सांगलीतील नेते गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाणार आहेत या सर्व वावड्या आहेत, असा खुलासाही त्यांनी केला. शिवाय, एमआयएम विधानसभेला वंचित आघाडीतच असेल, ते स्वबळावर लढणार या बातम्यांत तथ्य नसल्याचे ते म्हणाले.
भाजप विरोधातील नेत्यांना ईडीच्या नोटीस येणे हा शुद्ध ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे. जे विकले जात नाहीत, जे घाबरत नाहीत त्यांना नोटीस पाठवून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय व्यक्तींनी यापुढे स्वच्छ प्रतिमा जपावी, आर्थिक व्यवहार पारदर्शक पद्धतीने करायला हवेत; तरच भाजपच्या हातातील ईडीचे राजकीय हत्यार बोथट करता येईल, असेही आंबेडकर म्हणाले.

Web Title: Police duty will do eight hours - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.