मुंबई : पोलीस दलही वाढत्या आधुनिकीकरणाबरोबरच टेक्नोसॅव्ही होत आहे. मुंबई पोलिसांनी टिष्ट्वटर अकाउंट सुरू केले; तर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी नागरिकांशी थेट टिष्ट्वटरद्वारे संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी चार ते साडेचार या वेळेत आयुक्त टिष्ट्वटर अकाउंटच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत होते. या वेळी नागरिकांनी त्यांना महिला सुरक्षा, भरधाव वेगाचे बळी, कुचकामी पोलीस यंत्रणा, पोलिसांची असभ्य वर्तणूक अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. जवळपास २५ ते ३० तरुण-तरुणींसह ज्येष्ठांनीही आयुक्तांशी संवाद साधून प्रश्न उपस्थित केले. तसेच पोलीस दलाबाबत मतेही मांडली. तरुणींनी विचारलेल्या महिला सुरक्षेच्या प्रश्नावर आयुक्तांनी नेहमीच सावध राहण्याचे आवाहन मुंबईकरांना केले. तर २०१६ हे वर्ष सर्वांत कमी गुन्हेगारीचे वर्ष ठरेल का, असा प्रश्न सुरेश सावंत या तरुणाने जावेद यांना विचारला. त्यावर जावेद यांनीही कारवाई करून गुन्हेगारी कमी करता येते, आमचाही तसेच करण्याचा प्रयत्न असल्याचे आश्वासन दिले. आयुक्तांनी नागरिकांशी साधलेला संवाद मुंबईकरांसाठी आज चर्चेचा विषय ठरला होता. (प्रतिनिधी)
ट्विटरद्वारे पोलीस आयुक्तांचा संवाद
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST