Join us

नवी मुंबईत पोलीस आयुक्तांची खुर्ची अस्थिरच

By admin | Updated: June 4, 2015 05:09 IST

पोलीस उपनिरीक्षक ते उपआयुक्त दर्जापर्यंतचे अधिकारी नवी मुंबईमध्ये वर्णी लावण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे आयुक्तांची खुर्ची मात्र अस्थिर झाली आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपोलीस उपनिरीक्षक ते उपआयुक्त दर्जापर्यंतचे अधिकारी नवी मुंबईमध्ये वर्णी लावण्यासाठी धडपडत असताना दुसरीकडे आयुक्तांची खुर्ची मात्र अस्थिर झाली आहे. २१ वर्षांत १२ जणांची आयुक्तपदावर वर्णी लागली असून आतापर्यंत फक्त ३ जणांनीच कार्यकाळ पूर्ण केला आहे. राज्यातील महत्त्वाच्या पोलीस आयुक्तालयांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. नवी मुंबई, पनवेल व उरणपर्यंत आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत, जेएनपीटी, सर्वाधिक बांधकाम सुरू असलेला विभाग, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रस्तावित विमानतळ व अनेक महत्त्वाचे प्रकल्प आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत आहेत. यामुळे पोलीस दलामधील उपनिरीक्षक ते उपआयुक्त दर्जापर्यंतचे अधिकारी या ठिकाणी वर्णी लावून घेण्यासाठी नेत्यांपासून सर्व प्रकारची वशिलेबाजी करत असल्याचे चित्र पहावयास मिळते. शहरात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून आलेले काही अधिकारी नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस आयुक्त म्हणून येथेच बदली करून घेतल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. सद्यस्थितीमध्ये अधिकाऱ्यांमध्येही काही वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहायक आयुक्त यापूर्वीही याच ठिकाणी कर्तव्यावर होते. कनिष्ठ अधिकारी नवी मुंबईमध्ये जास्तीत जास्त काळ मिळावा यासाठी धडपडत असताना आयुक्तपदाची खुर्ची मात्र कायम अस्थिर राहिली आहे. ठाणे आयुक्तालयाचा भाग असलेल्या नवी मुंबईचा विकास झाल्यानंतर शासनाने २१ जानेवारी १९९४ ला नवी मुंबई आयुक्तालयाची स्थापना केली. के. एस. शिंदे यांनी पहिले आयुक्त म्हणून पदभार घेतला. परंतु १ वर्ष २ महिन्यात त्यांची बदली झाली. पहिल्या आयुक्तांपासून कार्यकाळ पूर्ण न करण्याची प्रथा २१ वर्षे कायम आहे. अपवाद एस. एम. आंबेडकर, विजय कांबळे व रामराव वाघ या तिघांनाच तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक झालेले ए. व्ही. पारसनिस व ए. एन. रॉय हेही अनुक्रमे दोन वर्षे व ९ महिने आयुक्त होते. आर. डी. गावंडे, रामराव घाडगे यांना एक वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करता आलेला नाही.आयुक्तपदावर वर्णी लागलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नवी मुंबईपेक्षा ठाणे, पुणे किंवा इतर मोठ्या पदावर वर्णी लागावी अशी महत्त्वाकांक्षा वाटू लागली आहे.अहमद जावेद यांनीही १ वर्ष दहा महिने काम पाहिले व येथून बदली करवून घेतली. के. एल. प्रसाद यांनी १५ महिने काम पाहिले व अपेक्षित ठिकाणी बदली न केल्यामुळे राजीनामा देणे पसंत केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आयुक्तपदाची खुर्ची अस्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे.