Join us

पोलीस वसाहती धोकादायक तर चौक्या ओसाड

By admin | Updated: December 15, 2014 23:48 IST

उल्हासनगरात हिललाइन, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, मध्यवर्ती अशी चार पोलीस ठाणी असून ठाण्यांशेजारीच पोलीस वसाहती उभारण्यात आल्या आहेत.

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरातील पोलीस वसाहती धोकादायक झाल्या असून दुरुस्ती व पुनर्बांधणीअभावी ओसाड पडल्या आहेत. तर बैठ्या चाळीतील वसाहतींत पोलीस जीव मुठीत घेऊन राहत असून काही पोलीस चौक्या वापराविना भंगारात निघाल्याचा आरोप विविध पक्षांचे पदाधिकारी करीत आहेत.उल्हासनगरात हिललाइन, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, मध्यवर्ती अशी चार पोलीस ठाणी असून ठाण्यांशेजारीच पोलीस वसाहती उभारण्यात आल्या आहेत. या वसाहतींमधील ७० टक्के घरे खाली असून बहुतांश पोलीस स्वत:च्या घरात अथवा भाड्याने राहत आहेत. तत्कालीन पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी राठोड यांनी वसाहतीच्या पुनर्बांधणी व दुरुस्तीची मागणी विभागाकडे पाठविली होती. हिललाइन पोलीस ठाण्याशेजारी बैठ्या चाळीच्या वसाहतीत ४९ खोल्या आहेत. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशेजारी ४ मजली धोकादायक इमारत व बैठ्या चाळी आहेत. उल्हासनगर पोलीस ठाण्याशेजारी ६० बैठ्या व मध्यवर्ती पोलीस ठाण्याशेजारी काही बैठ्या चाळी आहेत. पोलीस वसाहतीची इमारत व बैठ्या चाळीच्या वसाहती धोकादायक झाल्या आहेत. दारे, खिडक्या तुटलेल्या तर छत गळके आहे. पाणी, साफसफाई, नाले तुंबणे आदी समस्यांनी पोलीस कुटुंबे हैराण झाली आहेत. डुकरे, कुत्र्यांनी हैदोस घातल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वसाहतीची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होऊनही समस्या जैसे थे आहेत.