नवी मुंबई : वाशी पोलिसांनी ड्रग बाळगणाऱ्या एका नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. मॅथॉकोलीन नावाचे ड्रग घेवून तो वाशी पुलालगत आला असता पोलिसांनी त्याला पकडले. मात्र त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा शोध घेईपर्यंत त्याला चौकीत ठेवले असता त्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात चौकीची तोडफोड केली. यावेळी तो स्वत: ड्रगच्या नशेत होता.वाशी प्लाझालगतच्या पुलाजवळ एक नायजेरियन व्यक्ती ड्रग्स घेवून येणार असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सूरज पाडवी यांच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी त्याठिकाणी सापळा रचला होता. तिथे आलेल्या एका नायजेरियन तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे ३२ ग्रॅम मॅथॉकोलीन नावाचे ड्रग आढळले. ओनेकाची जोसेफ आगिडी (२६) असे त्याचे नाव आहे. त्याच्याच एका साथीदाराला विकण्यासाठी त्याने ड्रग आणले होते. तर त्या दोघांची भेट वाशी टोलनाकालगत होणार होती. त्यानुसार वाशी पोलीस त्याला घेवून वाशी टोलनाक्याच्या ठिकाणी गेले. त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी पोलिसांनी टोलनाक्यालगत सापळा रचला असताना ओनेकाची याला लगतच्या चौकीमध्ये बसवण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या ताब्यातून पळण्याच्या प्रयत्नात त्याने चौकीतील काचा व टेबलची तोडफोड केली. तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की करून मारहाण केली. त्यामध्ये चौघे पोलीस किरकोळ जखमी झाले. यावेळी ओनेकाची याने ड्रग घेतल्याचे पोलीस निरीक्षक पाडवी यांनी सांगितले. त्याच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तो मूळचा नायजेरियाचा राहणारा असून सध्या कोपरखैरणे येथे राहायला आहे.(प्रतिनिधी)
नायजेरियनकडून पोलीस चौकीची तोडफोड
By admin | Updated: July 27, 2015 23:39 IST