Join us  

पोलंडच्या हाराच्या मोहात शिक्षिकेने गमावले ६८ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 3:28 AM

फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुणाशी मैत्री झाली. याच मैत्रीतून पोलंडहून पाठविलेल्या हाराच्या मोहात शिक्षिकेला ६८ हजार ५०० रुपये गमविण्याची वेळ ओढावली.

मुंबई : फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुणाशी मैत्री झाली. याच मैत्रीतून पोलंडहून पाठविलेल्या हाराच्या मोहात शिक्षिकेला ६८ हजार ५०० रुपये गमविण्याची वेळ ओढावली. या प्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.करी रोड परिसरात तक्रारदार २८ वर्षीय शिक्षिका कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांना काही दिवसांपूर्वी अरविंद कुमारची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारली. त्याने तो अमेरिकन नौदलात कॅप्टन असल्याचे सांगितले. दोघांमधल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. संवादही वाढला. याच दरम्यान आॅक्टोबर महिन्यात त्याने पोलंड देशातून हिऱ्याचा हार भेटवस्तू म्हणून पाठविल्याचे सांगितले. त्याने व्हॉट्सअ‍ॅपला त्याचा फोटोही पाठविला. त्यामुळे तिनेही हाराचे स्वप्न रंगविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तिला दिल्लीच्या कस्टम कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून पोलंडहून आलेल्या पार्सलसाठी ६८ हजार ५०० रुपये भरावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. तिनेही विश्वास ठेवून ते पैसे जमा केले.