पंतप्रधानांनी ‘ती’च्या उपचारासाठी केली सहा कोटींची करमाफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 04:44 AM2021-02-10T04:44:06+5:302021-02-10T08:04:06+5:30

देवेंद्र फडणवीस यांनी पत्र देताच हलली सूत्रे

PM modi waives Rs 6 crore of taxes for teera kamats treatment | पंतप्रधानांनी ‘ती’च्या उपचारासाठी केली सहा कोटींची करमाफी!

पंतप्रधानांनी ‘ती’च्या उपचारासाठी केली सहा कोटींची करमाफी!

googlenewsNext

मुंबई : तीरा कामत या मुंबईतील पाच महिन्यांच्या बालिकेला जडलेल्या दुर्धर आजारावरील उपचाराचा भाग म्हणून तिच्या आईवडिलांनी औषधांसाठी तब्बल १६ कोटी रुपये लोकसहभागातून जमविले खरे; पण अमेरिकेतून आयात करावयाच्या औषधांवर सहा कोटी कर रकमेची तजवीज कशी करावी, अशी भ्रांत असतानाच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्राची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ दखल घेत पूर्ण करमाफी दिली.

फडणवीस यांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि त्याला तितक्याच तत्परतेने पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद यामुळे तीरावरील उपचाराचा मार्ग प्रशस्त झाला आहे. तीरा ही मिहिर व प्रियांका कामत यांची मुलगी. तीराला ‘स्पायनल मस्क्युलर अ‍ॅट्रोफी टाईप वन’ हा अत्यंत दुर्धर आजार आहे. त्यावरील उपचार हे अत्यंत महागडे. त्यासाठी थोड्याथोडक्या नव्हे तर १६ कोटी रुपयांची गरज होती. 

दानशूरांचे हजारो हात समोर आले आणि अशक्यतेवर शक्यतेची मोहोर उमटली; आवश्यक रक्कम जमा झाली. मात्र झोलगेन्स्मा या अमेरिकेतून आयात करावयाच्या औषधावर सहा कोटींचे सीमाशुल्क आणि जीएसटी लागणार होता. हे अशक्यप्रायच होते. मग मिहिर यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. त्यावर, त्यांनी १ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी, वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्र लिहून हे शुल्क माफ करण्याची विनंती केली.

‘तीरा’ला नवजीवन
पंतप्रधान मोदींनी तत्काळ त्याची दखल घेत आवश्यक ते निर्देश दिले. त्यानुसार केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सहसचिवांनी मंगळवारी सीमाशुल्क विभागाच्या मुंबईतील मुख्य आयुक्तांना पत्र लिहून ही करमाफी करण्याचे निर्देश दिले. साधारणत: अशी करमाफी मिळालीच तर त्यासाठी तीनचार महिने लागतात; पण केवळ आठ दिवसांत हा करमाफीचा निर्णय झाला. आता तीरावरील उपचार शक्य होणार असून तिला नवीन जीवन मिळणार आहे.

Read in English

Web Title: PM modi waives Rs 6 crore of taxes for teera kamats treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.