The player leaves the house because the family-in-law does not encourage playing kabaddi | सासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर

सासरची मंडळी कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन देत नसल्याने खेळाडूने सोडले घर

मुंबई : सासरच्या मंडळींकडून कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन दिले जात नसल्याने महिला खेळाडूने घर सोडून मुंबई गाठली. या मायानगरीच्या जाळ्यात महिला खेळाडू हरवली. मात्र रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी महिला खेळाडूला सहकार्य करून एका सामाजिक संस्थेत तिची रवानगी केली आहे.

हरयाणा येथील २० वर्षीय नुुपूर वर्मा (नावात बदल केला आहे) हिने कबड्डी खेळात विशेष प्रावीण्य मिळविले आहे. पुढे या खेळात वाटचाल करण्यासाठी सासरकडील मंडळी पाठिंबा देत नव्हते. त्यामुळे स्वबळावर नाव कमविण्यासाठी स्वप्ननगरीत येण्याची योजना तिने आखली. यासाठी मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम असे एकूण ३ लाख ११ हजार ५०० रुपये घेऊन १९ सप्टेंबर रोजी कोणालाही न सांगता तिने राहते घर सोडले. २० सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झाली. मात्र यापुढे करायचे काय? कुठे जायचे असे एक-एक प्रश्न नुपूर हिला गोंधळात टाकत होते. त्यामुळे २० सप्टेंबरचा संपूर्ण दिवस ती मुंबई सेंट्रल टर्मिनस येथील प्रतीक्षालयात बसून राहिली. २१ सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल टर्मिनसवर पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. या वेळी गस्त घालणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला कर्मचारी रजनी कदम आणि स्वप्नाली गंभीरराव यांना गोंधळलेली नुपूर निदर्शनास आली. त्यांनी ही माहिती मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यातील वरिष्ठांना सांगितली.

महिला पोलीस शिपाई ए. बी. शिंदे आणि पी. व्ही. काजळे यांच्यामार्फत महिला खेळाडू नुपूर हिला विश्वासात घेऊन विचारपूस करण्यासाठी चौकीत आणले. पोलिसांनी या नुपूरच्या मनातील गैरसमज दूर केला. कल्पना आणि वास्तव यातील फरक समजावून तिचे मन वळविण्यात आले. यासह तिच्या नातेवाइकांना कळविण्यात आले. तिची तात्पुत्या स्वरूपासाठी एका सामाजिक संस्थेत रवानगी केली आहे, अशी माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The player leaves the house because the family-in-law does not encourage playing kabaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.