प्लास्टिकच्या वापरामुळे मुंबईत वाढतोय ‘कचरा’; साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:38 IST2025-06-06T14:37:27+5:302025-06-06T14:38:29+5:30

मोठ्या प्रमाणात दंड वसूल करूनही प्लास्टिकचा वापर सर्रास सुरूच

Plastic waste is increasing in Mumbai; Fines of eight crores collected in seven and a half years, yet widespread use continues | प्लास्टिकच्या वापरामुळे मुंबईत वाढतोय ‘कचरा’; साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल

प्लास्टिकच्या वापरामुळे मुंबईत वाढतोय ‘कचरा’; साडेसात वर्षांत आठ कोटींचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई महापालिकेने प्लास्टिकविरोधात उगारलेले कारवाईचे अस्त्र कुचकामी ठरत आहे. २०१८ पासून मे २०२५ पर्यंत पालिकेने प्लास्टिक पिशव्या व अन्य साहित्य विक्रीस ठेवणारे दुकानदार व विक्रेत्यांकडून  एक लाख १३ हजार ८२ किलो प्लास्टिक जप्त करत त्यांच्याकडून आठ कोटींचा दंडही वसूल केला आहे. प्लास्टिक वापरासाठीच्या दंडाबाबत नवीन धोरण अद्याप प्रलंबित असल्याने, मुंबईत तरी प्लास्टिकबंदी केवळ कागदावरच उरली आहे.

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुराला प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. प्लास्टिकच्या या पिशव्या विकणारे किंवा बाळगणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाईला सुरुवात झाली. कोरोनाकाळात ही कारवाई थंडावली. मात्र, पालिकेने १ जुलै २०२२ पासून बंदी घातलेल्या प्लास्टिकविरोधातील मोहीम पुन्हा हाती घेतली. 

त्यानुसार परवाना विभागाचे प्रभागनिहाय पथक बाजार, दुकाने यांना भेटी देत, बंदी असलेले प्लास्टिक जप्त करून दंडवसुली सुरू केली. ही कारवाई निरंतर सुरू असली, तरी त्याला पूर्णत: आळा बसलेला नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्यात प्लास्टिकचे ढीग पाहायला मिळत आहेत.

संयुक्त कारवाईही कुचकामी?

मुंबईतील वातावरण आणि हवेच्या गुणवत्तेसंदर्भात जानेवारी २०२५ मध्ये पालिका मुख्यालयात राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासोबत (एमपीसीबी) विशेष बैठक पार पडली. त्यावेळी घनकचरा, एकल वापराचे प्लास्टिक यावर ‘एमपीसीबी’ने काही मुद्दे उपस्थित केले. प्लास्टिकमुक्तीसाठी प्लास्टिकविक्री व वापर करणाऱ्यांवर नियमभंग केल्याबद्दल कारवाई करण्याचे आदेश मुंबईसह सर्व महापालिकांना देण्यात आले आहेत. मात्र, ही कारवाई कठोर करण्यासाठी महापालिका आणि पोलिसांचीही मदत घेणार असल्याचे ‘एमपीसीबी’ने सांगितले. 

पिशव्या, खाद्यपदार्थांच्या पाकिटांची आवरणे अधिक

मुंबईत आढळणाऱ्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिकच असते. त्यात भाजी-फळांसाठी वापरण्यात येणाऱ्यांमध्ये सर्वाधिक पिशव्या, खाद्यपदार्थांच्या पाकिटांची आवरणे यांचा समावेश असतो. प्लास्टिक बाटल्या आणि थाळ्या, ग्लास, चमचे, पिशव्या, वाट्या, कंटेनर, स्ट्रॉ, कप या प्लास्टिकचाही वाढता वापर हा पर्यावरण आणि आरोग्यालाही घातक आहे.

२३ जून २०१८ ते ३१ मे पर्यंतची कारवाई

  • भेटी - २८,१४,४९९

  • एकूण प्रकरणे १६,६४१ 

  • जप्त प्लास्टिक १,१३,०८२.१२५ कि.ग्रॅ.

  •  दंड वसूल (रुपयांत) ८,३२,००,०००

Web Title: Plastic waste is increasing in Mumbai; Fines of eight crores collected in seven and a half years, yet widespread use continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.