Join us  

Plastic Ban : प्लॅस्टिकअभावी मुंबईकरांची त्रेधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 2:26 AM

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्यास काही प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टिकला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी मुंबई मनपाच्या अधिका-यांनी शनिवारी वॉर्निंग परेडचे आयोजन केले होते

मुंबई : पावसाळ्यात मुंबईची तुंबई होण्यास काही प्रमाणात कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टिकला पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी मुंबई मनपाच्या अधिका-यांनी शनिवारी वॉर्निंग परेडचे आयोजन केले होते. राज्यभर कारवाई आणि छापासत्र सुरू असताना मुंबई मनपा अधिकाºयांनी मात्र व्यापारी आणि विक्रेतावर्गाला कारवाईची माहिती देत प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याचे आवाहन केले. दरम्यान, उभ्या मुंबईकरांची प्लॅस्टिकअभावी त्रेधातिरपीट उडाल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.आधीच प्लॅस्टिकबंदी आणि त्यात कमबॅक केलेल्या मान्सूनमुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसले. रोजच्या भाजीपासून चमचमीत भजीपर्यंत प्रत्येक ठिकाणी पार्सल नेण्यासाठी मुंबईकरांना कापडी पिशव्यांचा वापर करावा लागला. जबर दंडाची धास्ती घेतलेल्या मुंबईतील व्यापारी आणि फेरीवाल्यांनी शुक्रवारपर्यंत दुकानातील प्लॅस्टिक पिशव्यांची विल्हेवाट लावली होती. त्यामुळे विविध वस्तू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागले. याउलट बहुतेक सुज्ञ ग्राहकांनी कापडी व कागदी पिशव्यांद्वारे प्लॅस्टिकची अडचण दूर केली.मुंबई मनपाने नेमलेल्या २५० निरीक्षकांनी मात्र शनिवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करत व्यापारीवर्गामध्ये जनजागृती केली. मनपाने मुख्यालयात निरीक्षकांची आढावा बैठक घेतल्यानंतर सीएसएमटी परिसरासह कॉफ्रर्ड मार्केट इथे जनजागृती रॅली काढली. या वेळी दुकानदारांना प्लॅस्टिक न ठेवण्याबाबत केवळ सूचना करण्यात आल्या. वरिष्ठांच्या आदेशानंतरच दंडात्मक कारवाई सुरू केली जाणार असून सोमवारपासून ही दंडात्मक कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे.पिशवी घरूनच आणा!प्लॅस्टिकबंदीचे स्वागत करत आहोत. फुलांची देवाण-घेवाण करताना पेपर व पळसाच्या पानांचा वापर केला जात आहे. मोठ्या संख्येने फुलांची मागणी असेल, तर गोणपाटाच्या पिशव्यांचा वापर बाजारात होत आहे. फुले ओली असल्यामुळे पेपरमध्ये बांधून नेणे ग्राहकांना कठीण जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी घरूनच कापडी किंवा कागदी पिशवी आणण्याचा सल्ला विक्रेते देत आहेत. - प्रसाद घाडीगावकर,फूल विक्रेतासोमवारी दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवणारमालाड पूर्व दत्त मंदिर येथे शनिवारी रात्री सुमारे ३०० व्यापाºयांची तातडीची बैठक झाली. ५० मायक्रॉन खालील प्लास्टिक आम्ही पिशव्या बंद केल्या आहेत. मात्र, ५० मायक्रॉन वरील प्लास्टिक पिशव्यांना पर्याय द्यावा, अशी मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. येत्या सोमवारी हे व्यापारी या संदर्भात ‘पी’ उत्तरच्या सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती फरसाण व्यपारी नामदेव झिंगाडे यांनी लोकमतला दिली. मालाड येथील दुकाने सोमवारी दुपारपर्यंत स्वेच्छेने बंद ठेवण्यात येतील, त्यापुढील दिशा आयुक्तांच्या भेटीनंतर ठरेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.पर्यायाअभावी तोट्याचा सामनाकागदी कप किंवा काचेच्या ग्लासात ग्राहकांना चहा देत आहोत. प्लॅस्टिकबंदीमुळे पार्सल चहा विकणे बंद केले आहे. पर्याय मिळत नाही, तोपर्यंत दिवसाला सुमारे ५०० रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागत आहे.- चंद्रकांत दुबे, चहा व्यापारीप्लॅस्टिकचे विघटन होत नाही. प्लॅस्टिकमुळे कित्येक पिढ्यांवर दुष्परिणाम होणार आहे. निर्णयाचा सुरुवातीला त्रास सहन करावा लागणार आहे, परंतु एकदा सवय लागली की, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. - गौरव पवार, गिरगावथोडा वेळ द्यावा लागेल!बंदीचा भाजी व्यवसायावर परिणाम झाला आहे. आधी फक्त कोथिंबीर पेपरमध्ये बांधून देत होतो. आता सर्व पालेभाज्या, फळभाज्या कागदात बांधून देत आहोत. काही ग्राहक कापडी किंवा कागदी पिशव्या घेऊन भाजीची खरेदी करत आहेत. त्यामुळे अडचण कमी होण्यास थोडा वेळ लागेल.- अंकिता तांबे, भाजी विक्रेत्याप्लॅस्टिकबंदीमुळे माझा वडापावचा धंदा मंद गतीने सुरू आहे. वडा, भजी, कटलेट्स, समोसा असे पदार्थ कागदावर तेल सोडतात. मात्र, प्लॅस्टिकबंदीमुळे आता नाइलाजास्तव कागदामध्येच पदार्थ गुंडाळून द्यावे लागत आहेत. - संदीप वाडकर, वडापाव विक्रेते 

टॅग्स :प्लॅस्टिक बंदी