Join us  

नियोजन : शैक्षणिक वर्षात संमिश्र पद्धतीने शाळा सुरू करण्याला पसंती (star news 708)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:07 AM

शिक्षक -विद्यार्थी लसीकरण पूर्ण न होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात शाळा सुरू न करण्याकडे कललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :साधारणतः ...

शिक्षक -विद्यार्थी लसीकरण पूर्ण न होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात शाळा सुरू न करण्याकडे कल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

साधारणतः शाळा आणि महाविद्यालयांचे नवीन शैक्षणिक वर्ष नियमित पद्धतीने दरवर्षी १५ जूननंतर सुरू होते. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक जिल्ह्यांतील शाळा थोड्या कालावधीसाठी सुरू झाल्या. मात्र, त्यानंतर त्या बंदच ठेवण्यात आल्या. यंदाही उन्हाळी सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्ष १५ जून २०२१ रोजी सुरू होईल, असे शिक्षण विभागाकडून घोषित करण्यात आले असले तरी सद्य:परिस्थिती पाहता शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, शिक्षक, पालक, विद्यार्थी या साऱ्यांनाच याबद्दल साशंकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी शैक्षणिक वर्ष सुरू होताना किमान विद्यार्थी, शिक्षकांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला तरच सुरक्षिततेची थोडी फार खात्री देता येईल, अन्यथा संमिश्र पद्धतीनेच नवीन शैक्षणिक वर्षातही शाळा सुरू करण्याकडे शाळा आणि विद्यार्थी पालकांचा कल असल्याचा सूर सध्यातरी उमटत आहे.

कोरोनामुळे यंदा पहिली ते आठवी तसेच नववी आणि अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील संकरित व आकारिक मूल्यमापनाच्या आधारावर या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या आणि त्यांना गुणपत्रके देण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जेव्हा काही काळासाठी राज्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू करण्यात आल्या होत्या तेव्हा शाळा पुन्हा बंद करण्याच्या निर्णयाआधीपर्यंत जवळपास ११ हजारांहून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. यामध्ये राज्यातील तब्ब्ल ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी उपस्थितीही दर्शविली होती. मात्र, संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढू लागल्यावर विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही प्राथमिकता असल्याने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता तर कोरोनाचा प्रादुर्भाव त्यावेळेच्या प्रादुर्भावापेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. त्यामुळे शिक्षण विभाग जो निर्णय घेईल त्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष प्रत्यक्ष सुरू करायचे की मागील वर्षीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवायचे हा निर्णय घेण्यात येईल, असे मत मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.

सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थी आणि शिक्षक यांचे पूर्ण लसीकरण झाल्याशिवाय प्रत्यक्ष शाळा सुरू करू नयेत, अशी मागणी पालक संघटना करत आहेत. विद्यार्थी सुरक्षितता लक्षात घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू न करता ऑनलाईन, अभ्यास पुस्तिका, चाचण्या यामधूनच अभ्यास सुरू ठेवावा, अशी मागणी ते करत आहेत. याचप्रमाणे शिक्षकांनाही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे आणि मगच त्यांना शाळांमध्ये बोलवावे, अशी मागणी शिक्षक संघटना करत आहेत. आधीच राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने आता शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे लसीकरण अवघडच झाले आहे. या पार्श्वभूमीवर नवीन शैक्षणिक वर्षात शाळा प्रत्यक्ष सुरू करणे अवघडच असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक, मुख्याध्यापक देत आहेत.

-----------------

बॉक्स

शाळा ऑनलाईनसाठी तयार

सद्य:स्थितीत विद्यार्थी, पालक ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याला पसंती देत आहेत. शिक्षणाच्या इतिहासात यापूर्वी ऑनलाईन लर्निंग चॅनलचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जागतिक स्तरावर वापर कधीही झाला नव्हता. आता बहुतांश विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शिक्षणासाठीची ऑनलाईन साधने कशी वापरायची ते समजले आहे. त्यामुळे संमिश्र शिक्षण पद्धती ही यापुढील शैक्षणिक प्रगतीचा मार्ग असणार आहे.

-------

प्रतिक्रिया

शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय त्यांना शाळेत बोलावले जाऊ नये यामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि त्या दोघांची कुटुंबे या सगळ्यांचीच आरोग्य सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. यामुळे शिक्षकांचे लसीकरण झाले नाही तर ऑनलाईन पद्धतीनेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करावे.

आनंद मोरे, शिक्षक.

-----------

शाळा लवकरात लवकरात सुरू कराव्यात अशी इच्छा आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता योग्य ती काळजी शाळांना घ्यायला हवी. अडचणी आल्यास शाळेत जाण्याची परवानगी हवी नाही तर ऑनलाईन शिक्षणाचा पर्यायही सुरू राहायला हवा.

चैतन्य मोडक, विद्यार्थी, इयत्ता आठवी.

----------

विद्यार्थी आणि शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय शाळा प्रत्यक्ष सुरूच करू नये. विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ? सध्या तरी ऑनलाईन पद्धतीनेच शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घ्यावा.

गीतांजली आमरे, पालक.

------------