Join us  

पाचाड धर्मशाळेची दयनीय अवस्था

By admin | Published: November 18, 2014 10:41 PM

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील धर्मशाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे

संदीप जाधव, महाडछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील धर्मशाळेची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांसह शिवभक्तांकडून केला जात आहे.दिवाळी सुट्टीसह डिसेंबर महिन्यापासून रायगडाचे दर्शन घेण्यासाठी हजारो पर्यटकांसह शैक्षणिक सहलीदेखील मोठ्या प्रमाणावर येत असतात. गडावर पर्यटन महामंडळाची निवासव्यवस्था असली तरी ती सामान्य पर्यटकांना परवडणारी नाही. त्यामुळे अशा पर्यटकांना गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे असलेल्या सा.बां. विभागाच्या धर्मशाळेचा आधार घ्यावा लागतो. मात्र या धर्मशाळेची गेल्या दोन वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी मोडकी स्वच्छतागृहे, पाण्याची गैरसोय तसेच विद्युत व्यवस्थादेखील नसल्याने या धर्मशाळेचा वापर केला जात नाही. दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची निवाऱ्याची सोय होऊ शकते. मात्र धर्मशाळेच्या दुर्दशेमुळे या ठिकाणी कुठलाही पर्यटक राहण्यास धजावत नाही. येत्या काही दिवसांत रायगडावर येणाऱ्या शैक्षणिक सहलींचा ओघ वाढणार असल्याने या सहलीतील विद्यार्थ्यांची निवाऱ्याअभावी गैरसोय होण्याची शक्यता आहे. धर्मशाळेच्या दुरवस्थेमुळे सहलीतील विद्यार्थी भर थंडीतही मोकळ्या ठिकाणी कुडकुडत रात्र काढत असल्याचे गेल्यावर्षी चित्र पाहावयास मिळाले होते. या धर्मशाळेची येत्या काही दिवसांत युद्धपातळीवरुन दुरुस्ती करुन येथील गैरसोयी दूर केल्या तर विद्यार्थ्यांना व पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.