Join us

ज्याच्यावर कचरा टाकला तो कंत्राटदार नव्हे तर साधा कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चांदिवली येथील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई केली नाही म्हणून ज्या व्यक्तीवर कचरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चांदिवली येथील शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी नालेसफाई केली नाही म्हणून ज्या व्यक्तीवर कचरा टाकला, नाल्यात बसवले तो कंत्राटदार नसून साधा कामगार आहे. त्या तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आमदार यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भाजपचे पालिकेतील गटनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे.

आमदार लांडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी नालेसफाई केली नसल्याचा आरोप करत रविवारी कमानी परिसरात कंत्राटदाराला नाल्यातच बसायला लावले. त्यानंतर त्याच्यावर तिथलाच कचरा टाकण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लांडे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. मात्र, कंत्राटदाराने नालेसफाई केली नाही, त्यामुळे शिवसेना पक्षाची बदनामी होत असल्याने कंत्राटदाराला जबाबदारीची जाणीव करून दिल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात सदर व्यक्ती कंत्राटदार नसून साधा कामगार असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. या कामगारावर सध्या उपचार चालू असल्याचे सांगत त्याबाबतचे पुरावेही सोशल मीडियातून जाहीर केले आहे.

कंत्राटदार जे सांगेल, ते कामगार करणार!

शिवसेना कंत्राटदाराला का प्रश्न विचारत नाही? त्यांच्याकडून दलाली घ्यायची आणि कामगारांना मारहाण करायची, हीच शिवसेनेची नीती आहे. आज तो तरुण रुग्णालयात उपचार घेत आहे. यावर महापौर, मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सारे गप्प असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे.

या सर्व प्रकरणाची सत्ताधारी म्हणून शिवसेनेने, महापौर म्हणून किशोरी पेडणेकर यांनी याची नैतिक जबाबदारी घ्यायला हवी आणि या कामगाराला मारहाण करणाऱ्या शिवसेना आमदारावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हायला हवी. महापालिकेसाठी काम करणारा प्रत्येक कामगार ही महापौर व आयुक्तांची जबाबदारी आहे. त्यामुळे या मारहाणीची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घ्यावी, अशी मागणीही मिश्रा यांनी केली आहे.