Penalty for five lakhs of lemon juice shopper | ‘त्या’ लिंबू सरबत विक्रेत्याला पाच लाखांचा दंड
‘त्या’ लिंबू सरबत विक्रेत्याला पाच लाखांचा दंड

मुंबई : कुर्ला स्थानकावर लिंबू सरबत बनविणाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने, मध्य रेल्वे प्रशासनाने लिंबू सरबत विक्रेत्याच्या स्टॉलला टाळे ठोकले. या विक्रेत्याच्या लिंबू सरबताची तपासणी करण्यासाठी काही नमुने घेण्यात आले होते. या नमुन्यातून हे लिंबू सरबत मानवी आरोग्यास दाह पोहोचविणारे असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या विक्रेत्याला पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
तपासणीअंती लिंबू सरबतामुळे प्रवाशांना न्युमोनिया, मूत्राशयाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसेच ई-कोलाय हे जीवाणू जास्त आढळून आले. त्यांच्यामुळे प्रवाशांमध्ये ताण वाढणे, अतिसार होऊ शकतो. त्यामुळे विक्रेत्यावर कारवाई केली.


असे प्रकार खपवून घेणार नाही
मध्य रेल्वे प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन कुर्ला स्थानकावरील परवानाधारक लिंबू सरबत विक्रेत्याला पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना स्वच्छ आणि उत्तम दर्जाची खाद्यपदार्थ पुरविण्यासाठी कटिबद्ध असून, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.
- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

रेल्वे स्थानकांवर पॅकिंग शीतपेयाची मागणी वाढली
मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला स्थानकावर लिंबू सरबत बनविणाºयाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने लिंबू सरबत, काला खट्टा आणि आॅरेंज ज्यूस बंद केले. ही सरबते बंद केल्याने प्रवाशांकडून पॅकिंग सरबताच्या बाटल्यांची मागणी वाढली आहे.
मागील महिन्यात कुर्ला स्थानकावर किळसवाण्या पद्धतीने लिंबू सरबत बनविणाºयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने लिंबू सरबतासह इतर सरबते बंद केली. यावर तोडगा म्हणून स्टॉलधारकांनी वेगवेगळ्या कंपनीच्या आणि विविध चवीच्या पॅकिंग शीतपेयाच्या बाटल्या विक्रीस ठेवल्या आहेत. लिंबू सरबत ५ ते १० रुपयांना मिळत होते. मात्र पॅकिंग बाटल्या २० ते ४० रुपयांना मिळत आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिप्पट ते चौपट खर्च येतो.


Web Title: Penalty for five lakhs of lemon juice shopper
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.