पर्ल्स चीट फंड प्रकरण: वसई पट्ट्यातील १८७ कोटी रुपयांची ७५ एकर जमीन ‘ईडी’च्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 05:22 AM2022-05-21T05:22:59+5:302022-05-21T05:23:34+5:30

पर्ल्स ग्रुप कंपनीच्या देशव्यापी ६० हजार कोटी रुपयांच्या चीट फंड घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती पुढे आली.

pearls cheat fund case 75 acres of land worth rs 187 crore in vasai lease in ed possession | पर्ल्स चीट फंड प्रकरण: वसई पट्ट्यातील १८७ कोटी रुपयांची ७५ एकर जमीन ‘ईडी’च्या ताब्यात

पर्ल्स चीट फंड प्रकरण: वसई पट्ट्यातील १८७ कोटी रुपयांची ७५ एकर जमीन ‘ईडी’च्या ताब्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वसई पट्ट्यात जमिनीची खरेदी करत त्यांचे प्लॉट पाडत सामान्य ग्राहकांना विकणे किंवा मूळ मालकाकडून कमी दराने जागा खरेदी करत चढ्या दराने अन्य कंपन्यांना विकणे, काही जागांची फेरखरेदी करणे, अशा क्लिष्ट व्यवहारांत कोट्यवधी रुपयांची फेरफार केल्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) मुंबई व पुण्यात कार्यरत कंपनीच्या मालकीची तब्बल ७५ एकर (तीन लाख चौरस मीटर) जमीन तसेच बँक खात्यातील साडेसात कोटी जप्त केले आहेत. ईडीने ताब्यात घेतलेल्या या वसई पट्ट्यातील जमिनी असून सरकारी दरानुसार त्याची किंमत १८७ कोटी रुपये आहे. मनी लाॅड्रिंग कायद्यान्वये ही कारवाई झाली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, पर्ल्स ग्रुप कंपनीच्या देशव्यापी ६० हजार कोटी रुपयांच्या चीट फंड घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती पुढे आली. त्या अनुषंगाने ईडीने केलेल्या तपासात मुंबईस्थित डीडीपीएल ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लि. आणि युनिकॉर्न या कंपन्यांना पर्ल्स ग्रुपकडून मोठ्या प्रमाणावर पैसे प्राप्त झाल्याचे समजले. या प्राप्त पैशांतून या कंपन्यांनी पालघर जिल्ह्यातील वसई, तिवरी आदी गावांतून मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी करण्याचा सपाटा चालवला. यानंतर, या दोन्ही कंपन्यांनी काही कंपन्यांशी व्यवहार करत, त्या जागेवर उपलब्ध चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) तसेच, निवासी तथा व्यावसायिक प्रकल्प आदींचे व्यवहार करत अमाप नफेखोरी केली. 

विकत घेतलेल्या जमिनींची पुन्हा विक्री करणे, पुन्हा वेगळ्या जमिनी खरेदी करणे किंवा जमिनीच्या खरेदीचे आमिष दाखवत पैसे घेणे, परंतु जमीन न देणे व्यवस्था करणे, असे गुंतागुंतीचे व्यवहार केले. हे करताना पर्ल्स ग्रुपकडून मिळणाऱ्या भांडवलामध्ये अनियमितता दिसू नये, याकरिता डीजीपीएल आणि युनिकॉर्न या कंपन्यांनी आपल्या कंपनीतील भागभांडवलाचे प्रमाण सातत्याने बदलत ठेवले. प्राथमिक तपासात वसई पट्ट्यातील जागांचे व्यवहार उजेडात आले आहेत.

कोट्यवधींची फिरवाफिरवी...

- सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीट फंड योजना तसेच जमीन खरेदी योजनेद्वारे जमा झालेल्या पैशांपैकी सुमारे १०१ कोटी रुपये पर्ल्स ग्रुपने मुंबईस्थित धनश्री डेव्हलपर कंपनीकडे वळविले. 

- या १०१ कोटी रुपयांपैकी २६ कोटी रुपये डीडीपीएलकडे वळविण्यात आले तर दुसऱ्या प्रकरणात पर्ल्स ग्रुपने याच पद्धतीने तब्बल २,२८५ कोटी रुपये एका व्यावसायिकाकडे फिरविले.

- ज्याने डीडीपीएल आणि युनिकॉर्न या दोन कंपन्यांमध्ये ९४ कोटी रुपये गुंतविले. डीडीपीएल आणि युनिकॉर्न या दोन कंपन्यांनी या प्राप्त पैशांतून वसईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे.

Web Title: pearls cheat fund case 75 acres of land worth rs 187 crore in vasai lease in ed possession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.