नवी बँकिंग सुविधा लवकरच : बँकेच्या खर्चात बचत; खातेदारांनाही नवी सेवामनोज गडनीस - मुंबईज्या प्रमाणे सध्या कोणत्याही बँकेच्या एटीएम मशीनमधून आपल्याला पैसे काढण्याची मुभा आहे, त्याच धर्तीवर यापुढे आपल्याला कोणत्याही बँकेच्या एटीएममधून (जिथे कॅश डिपॉझिटची व्यवस्था आहे) पैसेही भरता येऊ शकतील, असे तंत्रज्ञान विकसित करण्यावर सध्या काम सुरू असून, चालू आर्थिक वर्षात ही सुविधा प्रत्यक्षात येऊ शकेल.भारतीय रिझर्व्ह बँकेने या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. आंतरबँकिंग व्यवहारातील रोखीचे व्यवहार विनासायास आणि वेगाने पार पाडण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या नॅशनल फायनान्शियल स्वीचमध्ये तशी सुधारणा करण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. या स्वीचच्या माध्यमातून देशातील सर्व बँकांची एटीएम ही एकमेकांशी जोडली गेली आहेत. या स्वीचमुळेच आपल्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपल्या खात्यातील पैसे काढणे शक्य होते. जशी ही सुविधा पैसे काढण्यासाठी सध्या उपलब्ध आहे, तशीच ती पैसे भरण्यासाठीही उपलब्ध करून द्यावी, या विचारातून हे तंत्रज्ञान आता विकसित करण्यावर काम सुरू असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एच.आर.खान यांनी दिली.उपलब्ध माहितीनुसार, एखादा ग्राहक बँकेत आल्यानंतर त्याने जर कोणताही सामान्य बँकिंग व्यवहार केला तर त्याकरिता (शहर अथवा विभागनिहाय) बँकेला ३५ ते ८५ रुपयांच्या दरम्यान खर्च होतो. पण हाच व्यवहार जर एटीएमच्या मार्फत केला तर हा खर्च १२ ते २९ रुपयांच्या दरम्यान होतो. यामुळेच एटीएममशीन्सचा वापर वाढविण्यावर बँका भर देत आहेत. देशातील एटीएममशीनच्या संख्या आता दोन कोटी आहेत. परंतु, ही मशीन्स केवळ पैसे काढण्यासाठी आणि अन्य काही बँकिंग व्यवहार करण्यासाठीच आहेत. या तुलनेत कॅश डिपॉझिट अर्थात रोखाचा भरणा करणाऱ्या एटीएमची संख्या जेमतेम ५० हजारांच्या घरात आहे. भविष्यात एटीएमचा विस्तार करताना १० पैकी ३ मशीन कॅश विड्रॉअल आणि कॅश डिपॉझिट अशी दुहेरी पर्याय उपलब्ध असलेली असावीत, अशी आशा यापूर्वीच शिखर बँकेने व्यक्त केली आहे. त्यामुळे जर कॅश डिपॉझिट करणाऱ्या मशीन्सची संख्या जसजशी वाढेल तसतसे ग्राहकांनाही कोणत्याही वेळी पैशांचा भरणा या मशीनच्या माध्यमातून करता येईल. तसेच, आपल्या बँकेखेरीज कोणत्याही बँकेच्या एटीएममधून आपल्या खात्यात पैशांचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यास ग्राहकांचा वेळ वाचतानाच बँकेच्याही खर्चात बचत होणार आहेत.
१ तुमची रक्कम घेऊन जिथे कॅश डिपॉझिट मशीन्सची सुविधा आहे, अशा एटीएम सेंटरमध्ये जावे लागेल.२ तुमच्या बँकेचे नाव, खाते क्रमांक किंवा आणखी एखादा कोड /पासवर्ड द्यावा लागेल.३ एटीएममधून पैसे काढणे तसेच तुमच्याकडील रक्कम कॅश डिपॉझिट मशीनमध्ये जमा करता येईल.